पुतळ्यांचे राजकारण

महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि सामाजिक ऐक्याची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान युगपुरुषांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणत स्वराज्य उभे केले. पण, आजच्या काळात महापुरुषांच्या नावावरून आणि त्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीवरून समाजात तणाव निर्माण होऊ लागला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये चौकाचौकांत महापुरुषांचे पुतळे उभारण्याच्या नावाखाली वाद निर्माण होताना दिसतात. काही समाजकंटक जाणीवपूर्वक एकाच परिसरात अनेक पुतळे उभारून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. गावामध्ये अनेक प्रकारच्या जाती -धर्माची एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी माणसं एकमेकांची डोकी फोडू लागली आहे. अचानक रात्री-अपरात्री सरकारी परवानगीशिवाय काहीजण गावातील लोकांचा विचार न घेता परस्पर अशा प्रकारचे पुतळे उभारतात. त्यातून वाद निर्माण होतो, भडक वक्तव्य केली जातात. त्या माध्यमातून तणाव निर्माण होऊन गावामध्ये दंगलीचे स्वरूप प्राप्त होते. गावाला पोलिसांच्या छावणीचा वेढा पडतो, एका जीवाने राहणारी माणसं एकमेकांचा जीव घ्यायला तयार होतात. एकी तुटून अविश्वासाची दरी निर्माण होत आहे, हे चित्र महाराष्ट्राच्या सामाजिक परंपरेला धक्का देणारे आहे.
महाराष्ट्रात महापुरुषांचे पुतळे उभारणे ही पूर्णतः नियमनबद्ध प्रक्रिया आहे. पुतळ्यांच्या निर्मितीसाठी स्वतंत्र कायदा नसला तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा 1966 व महानगरपालिका कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे बेकायदेशीर धार्मिक स्थळाचे आराखड्याबाबतचे 2009च्या आदेशाच्या आधारे कोणत्याही पुतळ्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. बेकायदेशीररीत्या पुतळा बसवल्यास व नियमांचे उल्लंघन केल्यास पुतळा हटवला जातो तसेच संबंधित समाजकंटकांवरती फौजदारी कारवाई होऊ शकते. तसेच पुतळा उभारताना अगर त्या अनुषंगाने प्रक्षोभक वक्तव्य करून कायदा-सुव्यवस्था बिघडवल्यास त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता कायद्याच्या तरतुदीखाली कठोर कार्यवाही केली जाते. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पुतळा उभारताना सार्वजनिक सुव्यवस्था बिघडणार नाही, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, जागेची मालकी स्पष्ट असेल आणि भविष्यातील देखभाल व संरक्षणाची जबाबदारी निश्चित असेल, या सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा बेकायदेशीर कृत्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
पूर्वी महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागे कृतज्ञता आणि आदरभाव होता. गावातील महापुरुषांचा पुतळा हा संपूर्ण समाजाचा अभिमान मानला जायचा. मात्र, आज पुतळा हा सन्मानाचे प्रतीक न राहता शक्तिप्रदर्शनाचे आणि राजकीय हेतू साधण्याचे साधन बनत चालला आहे. गेल्या काही वर्षांत जातीच्या आधारावर समाज विभागण्याचे प्रयत्न वाढले असून, पुतळे, जयंती आणि मिरवणुका यांचा वापर करून शक्तिप्रदर्शन करून सामाजिक तणाव निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत.
पुतळा उभारण्याचा प्रश्न हा फक्त स्थापनेपुरता मर्यादित नसतो. त्यानंतर त्याचे संरक्षण, स्वच्छता आणि देखभाल कोण करणार, पुतळ्याचा अवमान झाल्यास जबाबदारी कोण घेणार, त्यामुळे निर्माण होणार्‍या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची जबाबदारी कोणाची आहे, हे प्रश्न अनेकदा अनुत्तरित राहतात. अनेक ठिकाणी पुतळे उभारले जातात, पण काही काळानंतर त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे महापुरुषांचा सन्मान होण्याऐवजी त्यांच्या विचारांचा अपमान होतो. हे वास्तव कुणी झाकू शकत नाही.
सर्वांत धोकादायक प्रवृत्ती म्हणजे महापुरुषांचे ‘जातीकरण’. महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे नसतात; ते संपूर्ण समाजाचे मार्गदर्शक असतात. त्यांना जातीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न हा त्यांच्या विचारांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श हा ऐक्याचा होता. त्यांच्या विचारांचे पुरस्कर्ते सर्व मराठीजन आहेत, परंतु काहीजण विषयाचे राजकारण करून सामाजिक विभागणीचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचे आहे. परंतु समाजाने संयम आणि सजगता दाखवून विषय हाताळले पाहिजे. पुतळा उभारण्यापूर्वी त्या त्या गावातील समाजात एकमत घेऊन निर्णय करणे गरजेचे असते. त्यामुळे सामाजिक वाद निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, तर समाजाने भडकावू कृतींना बळी न पडता महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. कारण खरे स्मारक हे दगड-मातीचे नसते, तर विचारांचे असते. खरंतर रात्रीच्या अंधारात अनधिकृतपणे पुतळे उभारणे ही त्या महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली आहे. कायदेशीर पद्धतीने उपाययोजना करून थोर महापुरुषांच्या स्मारकाला विरोध करण्याची या महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही, परंतु दुसर्‍याच्या खासगी मालमत्तेत पुतळे उभारल्यास समाजा – समाजात वाद निर्माण होतात. काहीजण वादाला चिथावणी देऊन अजूनच वाढवतात. सामाजिक मत, कायदा-सुव्यवस्था तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय उभारले जाणार्‍या पुतळ्यामुळे व समाजकंटकांच्या कृतींमुळे समाजात द्वेष पसरतो आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येते.
महाराष्ट्राची ओळख ही ऐक्य, बंधुता आणि प्रगत विचारांची आहे. पुतळ्यांच्या राजकारणातून जर समाजात दुभंग निर्माण होत असेल तर ते थांबवणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांच्या नावावरून वाद पेटवण्याऐवजी त्यांच्या विचारांचा प्रकाश समाजात पसरवणे हेच खरे सुज्ञ माणसाचे कर्तव्य आहे. खरंतर पुतळे उभारून नव्हे, तर विचार उभे करून महाराष्ट्र घडेल हे लक्षात ठेवणे आज अत्यावश्यक आहे.
(लेखक संगमनेर न्यायालयात वकील आहेत.)

The politics of statues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *