युगप्रवर्तक क्रांतिरत्न : महात्मा जोतिबा फुले

जगप्रसिद्ध पाश्चिमात्य विचारवंत थॉमस कारलाइल
म्हणतात,’मानवतेच्या भल्यासाठी स्वतःचे उभे आयुष्य अर्पण करणारी माणसे राष्ट्राच्या इतिहासाला आकार आणि दिशा देत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या युगप्रवर्तक महामानवांशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अशाच युगप्रवर्तक महामानवांपैकी महात्मा जोतिबा फुले एक होय.
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये कटगुण (जि. सातारा) येथे आई चिमणाबाई व पिता गोविंदराव फुले यांच्या उदरी झाला. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव जोेतिराव गोविंदराव फुले असे होय. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते. मात्र, त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने लोक गोरेऐवजी फुले आडनावाने संबोधू लागले. जोेतिबा एक वर्षाचे असतानाच आई चिमणाबाई यांचे निधन झाल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी वडील गोविंदराव यांच्यावर पडली. आईच्या निधनानंतर ’आऊ’ सगुणाबाई यांनी जोतिबांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. म्हणून जोतिबा म्हणतात, ’तुम्ही मला नुसते जगविलेच नसून माणूस बनवले. जोेतिबांनी सगुणाबाईर्ंसाठी ’निर्मिकाचा शोध’ हे पुस्तक, तर सावित्रीबाईंनी ’आमची आऊ’ ही कविता त्यांच्यावर लिहिली. दुसर्‍यावर प्रेम कसे करावे हे मी तुमच्यापासून शिकलो. जोतिराव प्राथमिक शाळेत असताना अतिशय चौकस व अभ्यासू होते; परंतु जोेतिबांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण बंद करून त्यांना बांधकामात गुंतविले. पण सुदैवाने मुन्सी बेग व लिजिट यांच्या आग्रहामुळे जोेतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. 1841 मध्ये जोतिबांनी मिशनरी शाळेतून इंग्रजी माध्यमातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सन 1840 मध्ये जोतिबांचा विवाह वयाच्या 13 व्या वर्षी नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. खरंतर माणसाच्या जडणघडणीत परिस्थिती, मित्र आणि पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शालेय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज, वॉशिंग्टन यांची चरित्रे अभ्यासली. सन 1847 मध्ये थॉमस पेन यांचे ’राइट्स ऑफ मॅन’ या ग्रंथातून त्यांना ’हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वरनिर्मित नसून ती मानवनिर्मित आहे हे सत्य कळले.’ त्यानंतर जोतिराव आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात वरातीमागून जाताना त्यांना एका सनातनी माणसाने ’शूद्र’ म्हणून निघून जायला सांगितले. याच अपमानाने त्यांना जातीयवादाची तीव्रता समजली. या कटू प्रसंगातून त्यांनी शूद्रांना शिक्षण देण्याची भीष्मप्रतिज्ञा केली.
शैक्षणिक कार्य : शिक्षणाशिवाय समाजाचा विकास नाही. अज्ञानरूपी अंधःकारात चाच पडणार्‍या समाजाला तसेच मनुष्याला सत्य व असत्याचा अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त करण्याकरिता शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे जाणले. जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उधारी! म्हणून सर्वप्रथम स्त्री शिकली पाहिजे. यासाठी सन 1848 मध्ये जोतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केली. या शाळेत स्वतः जोेतिबांनी शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाईंना लिहिण्या- वाचण्यास शिकवले आणि त्याच शाळेत त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई शाळेत जात-येत असताना लोक त्यांच्या अंगावर चिखल, शेण व माती फेकत. प्रसंगी त्यांना दगड मारत. मात्र, सावित्रीबाई हे पुण्याचे काम निष्ठेने करीत. जोतिबा नेहमी म्हणत, हिंदू समाज व्यवस्थेत स्त्री पराधीन राहिली, पायाची दासी राहिली तर समाजोद्धाराचे चक्र थांबेल.स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्यासाठी दोघांनीही शिकले पाहिजे. कारण स्त्री व पुरुष हे सामाजिक उद्धाराच्या विकासाची दोन चाके आहेत. जोतिबांना समाजोद्धाराचे कार्य करताना घरातून विरोध झाला. जोेतिबांच्या वडिलांनीही आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे, हे न पटल्याने त्यांनी मुलगा जोेतिबा व सून सावित्री यांना सन 1849 मध्ये घराबाहेर काढले. शेवटी ’जेथे राघव तिथे सीता’,’जिथे ज्योती तेथे क्रांती सावित्री’ यानुसार प्रसंगी आपल्या घराचा त्यांनी त्याग केला. महात्मा जोेतिबा फुले व सावित्री यांनी 1851 मध्ये बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात दुसरी शाळा उघडली. 1852 मध्ये शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 1854 मध्ये फुले यांनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाचे काम केले. गौतम बुद्ध आणि संत कबीर यांच्या मूल्यवर्धक तत्त्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कोणी दिला असेल तर तो फक्त जोेतिराव फुले व सहचारिणी सावित्रीबाई फुले यांनी व या तत्त्वज्ञानाचा कळस कोणी बांधला असेल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात तीन गुरू मानले. प्रथम गुरू भगवान गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर व तिसरे महात्मा जोेतिबा फुले होय. महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून ’शेतकर्‍यांचा असूड, ’गुलामगिरी’, ’ब्राह्मणांचे कसब’, ’शिवाजी महाराजांचा पोवाडा’, ’सार्वजनिक सत्य धर्म’, ’इशारा’ ’अखंड व सत्सार’, ’तृतीय रत्न’(नाटक),’अस्पृश्यांची कैफियत’ आदी वैचारिक ग्रंथांतून बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानरूपी प्रकाशात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले. बहुजन वर्ग असंघटित असल्याने त्यांना एकत्रित आणण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. खर्‍या अर्थाने फुले यांचे समग्र जीवन हे तत्कालीन परिस्थितीतील भेदाभेद, ईश्वरीय थोतांड, अन्याय, अत्याचार, असमानतेच्या काळोखाने ग्रासलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक प्रकाशवाट होती. शेती कसणारी व्यक्ती ही खरी शेतीची मालक असते. सन 1883 मध्ये ’शेतकर्‍यांचा असूड’ या ग्रंथातून शेतकर्‍यांच्या शोषणाची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा, शेती आणि शेतकरी संबंधित सूक्ष्म निरीक्षण, शेतकर्‍यांच्या अपेक्षा, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेती विकासासाठी सिंचन, विहिरी, तलाव, धरणे निर्मितीवर भर व त्यासंबंधी विचार व्यक्त केले. या ग्रंथात त्यांनी शेतकर्‍यांच्या स्थिती, गतीचे व मागासलेपणाचे वास्तव मांडले. ’माती आडवा- पाणी जिरवा’ या शेती विकासाच्या महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाला त्यांनी जन्म दिला.
सत्यशोधक जलसाकार : शिक्षणाची जाणीव व अस्पृश्यता निवारणासाठी व समाज प्रबोधनाचे एक माध्यम म्हणून सत्यशोधक जलशांकडे पाहिले. महात्मा फुले नेहमी मनात इंग्रज जरूर आपले शत्रू असले, तरी त्यांची इंग्रजी भाषा आपली शत्रू नाही. इंग्रजी भाषा हे तर एक संदेश वाहनाचा एक अमूल्य साधन आहे. 1860 मध्ये फुले यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. 1863 मध्ये महात्मा फुलेंनी घरीच ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले. असे म्हणतात, ’प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो.’ क्रांतिज्योती सावित्रींनी पती महात्मा जोेतिबांच्या समाजकार्यात आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा टाकल्या. 11 मे 1888 मध्ये जनतेने कोळीवाड्यात सभा घेऊन जोेतिबा फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ’महात्मा’ ही पदवी बहाल केली.

Era-shaping revolutionary jewel: Mahatma Jyotiba Phule

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *