दुसर्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस घेणार ताबा
सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील इतर गुन्ह्यांमध्ये संबंधित आरोपींना शनिवारी (दि. 11) पुन्हा अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत काम करणार्या काही अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिलांना व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक छळ करणे तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. एका पीडित महिलेने पुढे येत तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकामागोमाग नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, या प्रकरणातील फरार असलेली आणि ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली अश्विनी चैनानी हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तिच्या चौकशीतून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक पोलिसांकडे या प्रकरणात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपासादरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना इतर गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.