माता मृत्यूच्या प्रमाणात चढउतार

सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीत सर्वाधिक मृत्यू

नाशिक : देवयानी सोनार

मालेगाव येथील साक्षी वनीस व सीमा आहेर या मातांचा प्रसूती पश्चात मृत्यू (दि. 13) झाला होता. कितीही उपाययोजना केल्या तरी माता मृत्यूचे प्रमाण कायम आहे. लागोपाठ घडणार्‍या घटनांमुळे माता मृत्यूचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी येथे माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. येवला, देवळ्यात हे प्रमाण शून्य आहे.

गेल्या पाच वर्षांत माता मृत्युदरात चढउतार दिसून येत आहे. विशेषतः आदिवासी भागात माता मृत्युदर जास्त असल्याने त्या भागात आरोग्य सुविधा, वेळेवर उपचार आणि जनजागृती यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय माता मृत्यूच्या 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार माता मृत्युदरात सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसते. 2025-26 मध्ये जिल्ह्याचा एकूण माता मृत्युदर 76 नोंदवला गेला आहे. एकूण 63 हजार 32 जिवंत जन्मांमागे 48 माता मृत्यू झाले आहेत. 2021-22 मध्ये जिल्ह्यात 81 हजार 285 जिवंत जन्मांमागे 54 माता मृत्यू होऊन माता मृत्युदर 66 होता. त्यानंतर 2022-23 मध्ये हा दर 41 पर्यंत खाली आला (72,612 जन्म, तर 30 मृत्यू). मात्र, 2023-24 मध्ये पुन्हा वाढ होऊन एमएमआर 77 (68,584 जन्म, तर 53 मृत्यू) झाला. 2024-25 मध्ये दर 68 (67,878 जन्म, 46 मृत्यू) असा नोंदवला गेला होता.
आदिवासी व बिगरआदिवासी भागात 2025-26 मध्ये आदिवासी ब्लॉक्समध्ये 35,113 जिवंत जन्मांमागे 33 माता मृत्यू होऊन एमएमआर 94 नोंदवला गेला, जो जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. बिगरआदिवासी भागात 27,919 जिवंत जन्मांमागे 15 मृत्यू होऊन एमएमआर 54 राहिला आहे.
सर्वाधिक माता मृत्यू होणार्‍या देशांमध्ये भारत एक नंबर आहे. द लॅन्सेट अ‍ॅब्स्टेट्रिक्स गायनॅकॉलॉजी अँड विमेन्स हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक माता मृत्यू होणार्‍या देशांत भारताचा समावेश आहे. या अभ्यासानुसार 2023 मध्ये जगभरात गर्भधारणा आणि प्रसूती संबंधित कारणांमुळे सुमारे 2.4 लाख महिलांचा मृत्यू झाला. यापैकी 24 हजार 700 मृत्यू भारतात झाले.
प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्त्राव, उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंंतागुंत, संसर्ग आणि इतर वैद्यकीय अडचणी ज्या टाळता येऊ शकणारी कारणे आहेत. परंतु जनजागृतीचा अभाव, योग्यवेळी उपचार न मिळणे हेही मोठे कारण आहे.

एमएमआर म्हणजे माता मृत्यू
दर प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे होणार्‍या माता मृत्यूंची संख्या, गर्भधारणा, प्रसूती किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत आईचा मृत्यू झाला तर तो माता मृत्यू मानला जातो.

माता मृत्यू कमी करण्यासाठी तालुकानिहाय अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून, अति जोखमीच्या मातांचा पाठपुरावा, तसेच सातव्या, आठव्या व नवव्या महिन्यातील समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्यसेविका हे व्हिजिट करतात जेणेकरून हाय रिक्स महिलांच्या प्रसूतीसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतात.होणार्‍या मातांसाठी आदिवासी भागात सर्व तपासण्या, सोनोग्राफीसह इतर चाचण्या पंधराव्या वित्त आयोगातून केल्या जातात. जननी सुरक्षाअंतर्गत, एसएसकेअंतर्गत औषधे आणि वाहतुकीचा खर्च मोफत केला जातो. अति जोखमीच्या मातांचा पाठपुरावा केला जातो. खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जात आहे.
– डॉ. हर्षल नेहते, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

माता मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना
जननी सुरक्षा योजना
शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी प्रोत्साहन.
ग्रामीण भागात 700 रुपये, शहरी 600 रुपये आर्थिक मदत.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना.
गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य.
पहिल्या अपत्यासाठी 5,000, मुलगी (दुसरे अपत्य) 6,000 रु.
जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
प्रसूती व अर्भकांसाठी पूर्ण मोफत सेवा.
औषधे, तपासण्या, सिझेरियन, रक्त व 102/108 रुग्णवाहिका मोफत.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान.
गरोदर महिलांची आरोग्य तपासणी शिबिरे.
एचपी, बीपी, मधुमेह, वजन तपासणी व समुपदेशन.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान
दर महिन्याच्या 9 तारखेला मोफत तपासणी.
हाय-रिस्क गर्भधारणा ओळख.
लक्ष्य कार्यक्रम
लेबर रूम व प्रसूती कक्षाची गुणवत्ता सुधारणा.
स्किल मिक्स प्रोग्राम
ग्रामीण भागात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणे.
आशा कार्यकर्त्या
नोंदणीपासून प्रसूतीनंतर गृहभेटी व आरोग्यसेवा.

ही आहेत कारणे
प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव हे माता मृत्यूचे सर्वांत मोठे कारण मानले जाते.
उच्च रक्तदाब.

प्रसूतीतील गुंतागुंत.
असुरक्षित गर्भपात.

अ‍ॅनिमिया(रक्ताची कमतरता)
वेळेवर उपचार न मिळणे.

वाहतूक सुविधा नसणे.
तज्ज्ञ डॉक्टर, सुविधांचा अभाव.

लवकर लग्न व कुपोषण.
जागरूकतेचा अभाव.

Fluctuations in maternal mortality rates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *