सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील रिद्धिसिद्धी मंदिरालगत असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथे टवाळखोरांचा वावर वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनपाकडून उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
भाजपाच्या पुढाकारातून या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतरच उद्यानाची स्थिती बिघडू लागली. सध्या उद्यानात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचलेला असून, स्वच्छतेचा अभाव जाणवत आहे.
उद्यानाचे प्रवेशद्वार दिवसरात्र उघडे असल्याने नागरिकांकडून थेट दुचाकी व चारचाकी वाहने आत नेली जातात. तसेच काही टवाळखोरांकडून लहान मुलांच्या खेळण्यांवर बसून त्यांची तोडफोड केली जात असल्याची तक्रार आहे. उद्यानातील झोके मोडकळीस आले आहेत. घसरगुंडीची उंची व रचना धोकादायक असल्याने लहान मुलांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय उद्यानात प्रेमीयुगुलांचा वावर वाढला असून काही जणांकडून अशोभनीय वर्तन केले जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मंदिरात येणार्या ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत जाब विचारल्यास त्यांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
उद्यानातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांकडून पालापाचोळा साफ करून तो बाहेरच टाकला जातो. मात्र, त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचीही तक्रार आहे. झाडांची छाटणी न झाल्याने परिसर बकाल दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानाचे प्रवेशद्वार रात्री बंद करावे, वाहनतळाला बंदी घालावी, नियमित स्वच्छता करावी, झाडांची छाटणी करावी, तसेच मुरुमाऐवजी पेव्हरब्लॉक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित व अद्ययावत खेळणी बसवून त्यांची नियमित देखभाल करावी, अशी मागणी पालक व भाविकांकडून करण्यात येत आहे.
The park in Ward 30 is in disrepair.