लासलगावसह परिसरात तापमान चाळिशीपार

ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष; विशेष काळजी घेण्याचे आवाहन

लासलगाव : वार्ताहर
लासलगावसह परिसरात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून, तापमानाचा पारा 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळी रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र दिसत आहे.
उष्माघाताचा धोका लक्षात घेता लासलगाव ग्रामीण रुग्णालयाने सतर्कता बाळगली असून, लासलगाव ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ सज्ज करण्यात आला आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळकृष्ण अहिरे यांनी सांगितले की, उष्माघाताची लक्षणे दिसणार्‍या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांंसाठी उपाय

दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी घ्यावे, हलके व सुती कपडे परिधान करावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये, थोडा वेळ विश्रांती घ्यावी.

ज्येष्ठांंसाठी विशेष काळजी

ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, नियमित औषधे वेळेवर घ्यावीत व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार द्रवपदार्थ घ्यावेत. चक्कर, अशक्तपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

उष्माघाताची प्रमुख लक्षणे

शरीराचे तापमान अचानक वाढणे, डोके गरगरणे, चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, प्रचंड घाम येणे किंवा उलट घाम बंद होणे, अंगात अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास किंवा बेशुद्धी.

लहान मुलांसाठी घ्यावयाची काळजी

मुलांना थेट उन्हात खेळू देऊ नये, वारंवार पाणी, दूध किंवा द्रवपदार्थ द्यावेत, हलके, सैल आणि सुती कपडे घालावेत. गाडीत किंवा बंद जागेत मुलांना एकटे सोडू नये. ताप, अशक्तपणा किंवा उलट्या झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे न्यावे.

Temperatures in Lasalgaon and other areas exceed 40 degrees Celsius

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *