इराणमध्ये लष्करी राजवट?

‘आयआरजीसी’ने देशाचा ताबा घेतल्याने खळबळ

तेहरान/इस्लामाबाद/वॉशिंग्टन :
अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचले आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांदरम्यान शांतता चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, इराणमध्ये अंतर्गत ’तख्त पालट’ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या सामर्थ्यशाली ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी’) ने देशाचा ताबा घेतल्याचा दावा केला जात आहे. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांना सत्तेतून बाजूला सारण्यात आले आहे. या घडामोडींमुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे, इस्लामाबादमध्ये चर्चेची तयारी सुरू असली, तरी इराणची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. मात्र, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत अमेरिका आपली नौसैनिक नाकेबंदी (ब्लॉकेड) हटवत नाही, तोपर्यंत इराण कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधून ही नाकेबंदी चर्चेतील मोठा अडथळा असल्याचे सांगितले आहे.
या संघर्षाचा परिणाम आता डॉलरच्या जागतिक वर्चस्वावरही होताना दिसत आहे. अमेरिकेने डॉलरच्या वापरावर निर्बंध घातल्यास संयुक्त अरब अमिराती (युएई) तेल आणि वायूचा व्यापार चिनी ’युआन’मध्ये सुरू करेल, अशी उघड धमकी युएईने दिली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत 1973 च्या ’वॉर पावर्स रेझोल्यूशन’नुसार (60 दिवसांचे घड्याळ), राष्ट्राध्यक्षांना कोणत्याही लष्करी कारवाईसाठी 60 दिवसांच्या आत संसदेची (काँग्रेस) मंजुरी घेणे बंधनकारक आहे. ट्रम्प यांच्यासाठी ही मोठी कायदेशीर आणि राजकीय अडचण ठरत आहे. दुसरीकडे, हूती बंडखोरांनी सौदी अरबच्या तेल निर्यातीवर हल्ले करण्याची धमकी दिल्याने संकट अधिक गहिरे झाले आहे. पाकिस्तान मध्यस्थ म्हणून काम करत असला तरी, देशांतर्गत शिया समुदायाचा रोष ओढवून घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ब्रिटनने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून टोल-मुक्त आणि सुरक्षित आहे. इराणमध्ये लष्करी गट (आयआरजीसी) प्रभावी झाल्याने मुत्सद्देगिरीचे मार्ग बंद होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामाबादमधील संभाव्य चर्चेकडे आणि इराणमधील अंतर्गत परिस्थितीकडे लागले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प

जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त तणाव वाढल्याने जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. अमेरिकेने इराणचे ’तौस्का’ हे मालवाहू जहाज जप्त केल्याने इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सागरी वाहतुकीवर देखरेख ठेवणार्‍या संस्थांच्या मते, सोमवारी या मार्गावरून केवळ तीन जहाजांनी प्रवास केला. गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

Military rule in Iran?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *