गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही आजच्या काळाची गरज आहे. सध्या वारंवार ऐकू येणार्‍या बातम्या खून, पैशांसाठी वाद, किरकोळ गोष्टीतून निर्माण होणारे संघर्ष अशा अनेक गोष्टी कानावर येताच मन एकवेळ शांत राहील, पण माझ्यातील लेखिका मात्र अस्वस्थ होते मग ती कशी शांत असणार..
ती प्रश्न विचारते, नेमकं चुकतंय कुठे? माणूसपण हरवत चाललंय का? की आपणच आपल्या संवेदनांना गाडून टाकत आहोत. मन कदाचित क्षणभर शांत होईल, पण माझ्यातील लेखिका मात्र पेटून उठते. ती प्रत्येक घटनेतून वेदना टिपते आणि विचारते, हा समाज नेमका कुठल्या दिशेने चाललाय? आज आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचत आहोत, पण या प्रगतीसोबतच एक काळी सावली आपल्या समाजावर पडताना दिसते,ती म्हणजे वाढती गुन्हेगारी, समाजाला वाटणारी भीतीची सावली, महिलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्हे. या घटनांमुळे मनात एकच प्रश्न निर्माण होतो, आपण खरोखर सुरक्षित आहोत का?
गुन्हेगारी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि चुकीची संगत यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गावर वळतात. जलद पैसा मिळवण्याची हव्यास आणि सोशल मीडियाचा गैरवापरदेखील गुन्ह्यांना खतपाणी घालतो. काही वेळा कुटुंबातील वादविवाद, कलह यांचा अभावही याला कारणीभूत ठरतो. या वाढत्या गुन्हेगारीचे परिणाम अत्यंत भयानक आहेत. समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते, लोक एकमेकांवरचा विश्वास गमावतात आणि सुरक्षिततेची भावना कमी होते. विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक वाढते, जी कोणत्याही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. या समस्येवर उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कडक कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षणाचा प्रसार, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि तरुणांना योग्य दिशा देणे हे उपाय महत्त्वाचे आहेत. यासोबतच प्रत्येक नागरिकाने सजग राहून कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे.
शेवटी, गुन्हेगारी ही फक्त सरकारची समस्या नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. जर आपण आजच जागे झालो नाही, तर उद्या सुरक्षित समाजाचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील. गुन्हेगारी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. बेरोजगारी, गरिबी, शिक्षणाचा अभाव, चुकीची संगत, व्यसनाधीनता आणि सामाजिक असमानता ही त्यातील प्रमुख कारणे आहेत.
यासोबतच चुकीची संगतही मोठा धोका ठरत आहे. वाईट विचारांची, गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं मुलांना चुकीचे मार्ग दाखवतात, आणि नकळत त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडतो. अशा वातावरणात वाढणारी मुलं हळूहळू चुकीच्या कृतींकडे वळतात आणि पुढे जाऊन गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते.
आजच्या काळात मुलांमध्ये वाढती आक्रमकता ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. साधा राग व्यक्त करण्याऐवजी थेट हिंसक प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून चिडचिड, भांडणं आणि मारामारी होऊ लागली आहे. हीच सवय जर वेळेत थांबवली नाही, तर पुढे जाऊन ती गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होण्याचा धोका नाकारता येत नाही.
सुरक्षित समाज घडवायचा असेल, तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून जबाबदारी स्वीकारायला हवी, कारण बदलाची खरी सुरुवात ‘आपण’ आहोत.
काही वेळा जलद श्रीमंत होण्याची लालसा देखील लोकांना चुकीच्या मार्गावर नेत असते. सोशल मीडियाचा चुकीचा वापर आणि हिंसक चित्रपटांचा प्रभावही तरुणांवर पडताना दिसतो.
कधीकधी बातम्या आणि टीव्हीवरील घटना पाहताना मन अस्वस्थ होते, आपला महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे? ज्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे महान व्यक्तिमत्त्व दिले, ज्या तत्त्वांंवर हा समाज उभा राहिला, त्याच महाराष्ट्रात आज वाढती गुन्हेगारी पाहून मनाला वेदना होतात. त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता न्याय, स्वाभिमान आणि सुरक्षिततेचा पाया घातला आणि आज आपणच त्या मूल्यांपासून दूर जात आहोत का, असा प्रश्न पडतो.
शेवटी मनात एकच विचार उरतो या परिस्थितीला नक्की जबाबदार कोण? शेवटी, दोष कुणाचा? असा नाही, तर बदलाची सुरुवात कोण करणार? हा आहे.
जर आपणच आपल्या जबाबदार्‍या ओळखल्या आणि योग्य मार्ग निवडला, तरच आपण पुन्हा एक सुरक्षित, सशक्त आणि मूल्यांवर उभा असलेला महाराष्ट्र घडवू शकतो. जपली ज्यांनी माती रक्ताने, दिला स्वाभिमानाचा श्वास, त्यांच्या महाराष्ट्रात आज का गुन्ह्यांचा वाढतोय त्रास.. गुन्हेगारी थांबवायची असेल, तर फक्त कायदा नाही तर मन बदलायला हवं. समाज सुरक्षित हवा असेल, तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी. शेवटी इतकेच सांगेल…. आजचा विचार बदलला, तरच उद्याचा समाज सुरक्षित राहील.

A society lost in the shadow of crime…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *