नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरातील राहुलनगर येथे एका नामांकित सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पारा अव्हेन्यू सोसायटीत लिफ्टचा वायर रोप तुटल्याने लिफ्ट थेट तिसर्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली. या भीषण अपघातात तीन महिन्यांच्या बाळंतिणीसह चार चिमुकले जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुलनगरमधील पारा अव्हेन्यू सोसायटीत रविवारी एका चिमुकलीच्या बारशाचा कार्यक्रम सुरू होता. पाहुण्यांची ये-जा सुरू असतानाच, रात्री साडेदहा वाजता लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात होती. तिसर्या मजल्याच्या सुमारास अचानक लिफ्टचा मुख्य वायर रोप तुटला आणि लिफ्ट प्रचंड वेगाने थेट तळमजल्यावर येऊन आदळली. मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. लिफ्टचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात गौरी अभिजीत मकवान (वय 24), ज्या तीन महिन्यांची बाळंतीण आहेत. तसेच हर्षित अभिजीत मकवान (वय 4), वैभवी मंगेश मकवान (वय 10), मनस्वी मंगेश मकवान (वय 4) हे जबर जखमी झाले. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिल्डर आणि लिफ्ट कंपनीचा हलगर्जीपणा नडला?
सोसायटीतील रहिवाशांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या लिफ्टमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत होते. याबाबत बिल्डर किसन चंद्रकांत पोखर आणि संबंधित लिफ्ट कंपनीकडे रहिवाशांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. हा केवळ अपघात नसून बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे ओढवलेली वेळ असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या प्रकरणी संतप्त रहिवाशांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत बिल्डर किसन पोखर आणि लिफ्ट कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, लिफ्टचे तांत्रिक ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
Woman and three children injured in elevator collapse; case registered