खोदकाम… वाहनधारक परेशान!

अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ना वाहतूक पोलिसांचा धाक उरला आहे, ना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची भीती. परिणामी शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. अनेक प्रमुख रस्त्यांवर खोदकाम झाल्याने काही मार्ग बंद आहेत, तर काही ठिकाणी एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत भर घालत अनेक वाहनधारक उलट्या दिशेने वाहन चालवत असल्याचे चित्र आहे.
रविवार कारंजा ते रेडक्रॉस, शरणपूर रोड, त्र्यंबक नाका ते मायको सर्कल, बारदान फाटा ते सातपूर रोड, आडगाव नाका या परिसरात वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने चौकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अपघात व वादाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले, तरी नियमभंग करणार्‍यांवर तातडीने कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांचे मनोबल वाढले आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक शिस्त प्रस्थापित करावी, अशी मागणी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या मागण्या
नियमभंग करणार्‍यांवर तत्काळ व कडक दंडात्मक कारवाई करावी.
बंद सिग्नल यंत्रणा त्वरित सुरू करणे.
पर्यायी मार्गांची स्पष्ट व्यवस्था.
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे.
जनजागृती मोहिमा राबविणे.

वाहतूक विस्कळीत होण्याची प्रमुख कारणे
रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे व अपूर्ण कामे.
अनेक मार्गांवर बंद किंवा अर्धवट वाहतूक.
सिग्नल यंत्रणा बंद पडणे.
नो एन्ट्रीत वाहन चालविण्याची वाढती प्रवृत्ती.
वाहतूक नियमांकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष.
सीसीटीव्ही कॅमेरे असूनही प्रभावी कारवाईचा अभाव.

Excavation… vehicle owners are worried!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *