बाधित शेतकर्यांचा आंदोलनाचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील बाह्य रिंगरोड व अंतर्गत रिंगरोड प्रकल्पासाठी चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात रविवारी (दि. 17 मे) नाशिक तालुक्यातील विल्होळी येथे कै. केशवराव थोरात ग्रामसंस्कार केंद्रात जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. अन्यायग्रस्त शेतकर्यांनी राज्य शासन व नाशिक जिल्हा प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत, ‘दडपशाही करून जमीन घेण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला शेतकर्यांच्या संघर्षाचा सामना करावा लागेल,’ असा स्पष्ट इशारा दिला.
बैठकीत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी शेतकर्यांनी एकमुखाने ठराव करत स्पष्ट केले की, मंत्री महाजन यांनी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप सुरूच ठेवला तर त्यांच्या कुंभमेळामंत्री या पदालाच न्यायालयात आव्हान दिले जाईल.
या बैठकीत नाशिक जिल्ह्याला तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींमधून पालकमंत्री द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावरही शेतकर्यांनी गंभीर आरोप केले. यापूर्वीही चुकीच्या जमीन हस्तांतरण प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका राहिल्याचा आरोप करत, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते अधिग्रहणासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले. मागण्या मान्य न झाल्यास शासनाविरोधात आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या बैठकीस छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शेतकरी नेते साहेबराव दातीर, अॅड. कैलास खांडबळे, कामगार नेते विक्रम नागरे, शिवसेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे यांच्यासह जिल्ह्यातील आंबे बहुला, राजूर बहुला, आडवण, त्र्यंबकेश्वर येथील बाधित शेतकरी, तसेच पारदेवी, चिंचोली, पांढुली, दरी, मातोरी, मुंगसरा, गोवर्धन, चांदशी, जलालपूर, महादेवपूर, पालखेड दिंडोरी, सिन्नर, अंबड, सातपूर, माडसांगवी अशा विविध गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व बाधित शेतकरी एकत्र येणार असून, यापूर्वी करण्यात आलेल्या चुकीच्या मोजण्या तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे. डीपी व आरपी रोडच्या नियमानुसारच नव्याने मोजणी करावी व ज्या शेतकर्यांची जमीन जाईल त्यांना चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. मातोरी व मुंगसरा येथे शेतकरी व महिलांवर झालेल्या लाठीचार्जबाबत काय कारवाई झाली, याचा जाबही जिल्हाधिकार्यांना विचारला जाणार आहे. यानंतर मुंगसरा येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ऐंशीवर्षीय आजीच्या घरी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तीन तासांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
Injustice by the government in the name of ring road