लातूरचे मोटेगावकर यांना अटक

नीट पेपरफुटी प्रकरण : 100 कोटींच्या साम्राज्याचा मालक सीबीआयच्या जाळ्यात

नवी दिल्ली :
देशभरात खळबळ उडवून देणार्‍या ’नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले असून, सीबीआयने कारवाईचा धडका लावला आहे. पेपरफुटीचे लातूर कनेक्शन समोर आले. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी, सीबीआयने मोटेगावर याची ट्रान्झिट रिमांड घेतली होती. दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमधील प्राथमिक चौकशीत शिवराज मोटेगावकर याच्याकडे महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने मोटेगावरकर यांना अटक केली. सोमवारी त्यांना सीबीआयच्या कोर्टात हजर केले होते. त्यावेळी सीबीआय कोर्टाने नऊ दिवसांची सीबीआय कोठडी दिली.

सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनवरून नीट परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आणि उत्तरे जप्त करण्यात आली आहेत. एका संघटित टोळीचे सक्रिय सदस्य म्हणून मोटेगावकर यांनी इतर आरोपींच्या संगनमताने परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. त्यांनी या प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आणि इतर संशयित व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या होत्या. सीबीआयचे विशेष पथक गेल्या चार दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून होते आणि सखोल चौकशीअंती हा मोठा पुरावा हाती लागला आहे.
अटकेपूर्वी सीबीआयने मोटेगावकर यांची जवळपास 11 तास मॅरेथॉन चौकशी केली होती. त्यानंतर लातूरच्या शिवनगर भागातील आरसीसीच्या मुख्य कार्यालयात आणि त्यांच्या निवासस्थानी नव्याने छापे टाकण्यात आले. या छाप्यांदरम्यान सीबीआयने इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत.
तपास यंत्रणेला संशय आहे की, आरसीसीच्या ’मॉक टेस्ट’ (सराव परीक्षा) मध्ये विचारण्यात आलेले अनेक प्रश्न हुबेहूब मुख्य नीट परीक्षेत आले होते. तसेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मोटेगावकर स्वतः विद्यार्थ्यांना विचारत आहेत की त्यांच्या सराव पेपरमधील किती प्रश्न मुख्य परीक्षेत आले, ज्यावर विद्यार्थ्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते.
शिवराज मोटेगावकर यांची पार्श्वभूमी अत्यंत साधी आणि संघर्षाची राहिली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सायकलवरून जाऊन होम ट्यूशन घेण्यापासून केली होती. केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयात सुवर्णपदक विजेते असलेल्या मोटेगावकर यांनी लातूरमध्ये फक्त काही विद्यार्थ्यांसह रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) ची स्थापना केली. त्यांनी लातूरच्या प्रसिद्ध ’लातूर पॅटर्न’चा आधार घेत अल्पावधीतच कोचिंग विश्वात मोठे नाव कमावले. आज आरसीसीचे जाळे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये पसरलेले असून, दरवर्षी सुमारे 20,000 ते 40,000 विद्यार्थी येथे नीट, जेईई आणि सीईटीच्या तयारीसाठी प्रवेश घेतात. प्रति विद्यार्थी सरासरी 50,000 ते 65,000 रुपये फी आकारली जात असल्याने या संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.सीबीआयच्या तपासात लातूरमधील इतरही काही मोठ्या नावांचा आणि डॉक्टरांचा या पेपरफुटी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

देशातील कोचिंग जगताला मोठा धक्का

या अटकेमुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील कोचिंग जगताला मोठा धक्का बसला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न दाखवणारे ’एम सर’ आता स्वतःच एका मोठ्या राष्ट्रीय घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार्‍या या पेपरफुटीच्या मुळाशी जाण्यासाठी सीबीआयने तपास अधिक तीव्र केला असून, आगामी काळात लातूर आणि महाराष्ट्रातील इतर भागांतून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपीची अटक

लातूरमधील प्रसिद्ध रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक.

ठोस पुरावा
मोटेगावकर यांच्या मोबाइल फोनमधून नीट परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आणि उत्तरे सीबीआयने केली जप्त.

घोटाळ्यातील भूमिका
एका संघटित टोळीचे सक्रिय सदस्य म्हणून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून त्या वितरित केल्याचा आरोप.

इतर कनेक्शन

एनटीएशी संबंधित प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह लातूर आणि नांदेडमधील इतर संशयितांची चौकशी सुरू.

पुढील कारवाई
सीबीआय मोटेगावकर यांना पुढील तपासासाठी पुण्याच्या विशेष न्यायालयासमोर हजर करणार.

Motegaonkar from Latur arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *