गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये गुन्हे, घोटाळे आणि विकासातील गोंधळ संपायचे नाव घेत नाही. त्यामुळे नाशिकची प्रतिमा मलिन झाली असून, व्यवस्था अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी, लैंगिक शोषण, फसवणूक, पेपरफुटी आणि सिंहस्थपूर्व कामातील असमन्वय यामुळे सांस्कृतिक नगरीला ग्रहण लागले आहे. नाशिक शहराची एक वेगळी ओळख आहे. धार्मिक नगरी, औद्योगिक विकासाची नगरी. पण गेल्या काही दिवसांपासून जो काही बदनामीचा डाग नाशिकला लागत आहे तो शहराच्या प्रगतीसाठी व भविष्यासाठी निश्चितच चांगला नाही. खरात, म्हाडा घोटाळा, एरंडे या प्रकरणांनी आधीच बदनामी झाली असतानाच ’नीट’ पेपरफुटीमध्येही नाव आल्याने नाशिकचे नाव वाईट अर्थाने सर्वदूर पोहोचत आहे. ही निश्चितच खेदाची बाब आहे.
एकेकाळी धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या नाशिक शहराची प्रतिमा गेल्या काही महिन्यांत विविध घटनांमुळे मलिन झाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक, कोट्यवधींचे जमीन घोटाळे, कॉर्पोेरेट क्षेत्रातील छळ, शासकीय यंत्रणांवरील प्रश्नचिन्ह आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा गोंधळ, सोशल मीडियावर खरातकांड, टीसीएस कांड, नीट पेपरफुटी प्रकरण, अजून कुंभमेळा घोटाळा बाकी असे म्हणत नाशिकची खिल्ली उडवली जात आहे. या सर्व घटनांंनी नाशिकची राज्यात नकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घटनांमध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून कायद्याच्या बालेकिल्ल्यात कोणाचीच खैर नाही हे अनेक बड्या आसामींना खाक्या दाखवत कारवाई सुरू ठेवल्याने तेवढीच समाधानाची बाब म्हणावी लागेल. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिस यशस्वी झाल्याने नाशिक सुरक्षित हातात असल्याचे समाधान आहे.
दोन महिन्यांपूर्वी खरात प्रकरणाने अंधश्रद्धेचा किती विकृत बाजार झाला आणि या बाजारात सेलिब्रिटींपासून ते राजकीय, प्रशासकीय अधिकार्यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज प्रकरण,नाशिक जिल्हा परिषदेतील लैगिक छळ प्रकरण,मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर याची पत्नी मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात अटक, खरात प्रकरण, पत्रकार रवींद्र एरंडे प्रकरण, अशोका मार्गावरील टीसीएस प्रकरण, म्हाडा प्रकरण, नीट परीक्षा पेपरफुटी आदी प्रकरणांनी नाशिकची कुप्रसिद्धी तर झालीच; परंतु आगामी सिंहस्थाच्या कामांत घोटाळ्याची दाट शक्यता असल्याचे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत.
भोंदू अशोक खरात प्रकरण : अंधश्रद्धा, शोषण आणि पैशांचा खेळ
नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. धार्मिक विधी, मंत्रतंत्र, मंत्रलेले पाणी आणि मृत्यूची भीती दाखवत लोकांची मानसिक व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. तपासात महिलांचे कथित लैंगिक शोषण, त्याचे व्हिडिओ तयार करणे आणि कोट्यवधींची आर्थिक उलाढाल समोर आली. विशेष तपास पथकाच्या हाती शेकडो व्हिडिओ क्लिप लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिर्डी-नाशिक परिसरातील शेतकर्यांच्या जमिनी बळकावल्याचे आरोपही पुढे आले. काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्तींशी कथित संबंध असल्याप्रकरणाने वेगळेच रूप घेतले. यामुळे नाशिकची प्रतिमा आध्यात्मिक केंद्राऐवजी अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या चर्चेत आली.
मदतीच्या आमिषातून कथित शोषण
स्वतःला पत्रकार, समाजसेवक आणि हस्तरेषातज्ज्ञ म्हणवणार्या रवींद्र एरंडे प्रकरणानेही समाज हादरला. सुरुवातीला खंडणीच्या तक्रारीतून उघड झालेल्या या प्रकरणात पोलिसांना कथित आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्यानंतर तपासाला नवे वळण मिळाले. महिलांना नोकरी, व्यवसाय किंवा मुलांच्या भविष्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांचे शोषण आणि ब्लॅकमेल केल्याचे आरोप समोर आले. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
वैद्यकीय क्षेत्रातील धक्का
नाशिकच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवली. शहरातील उच्चशिक्षित व प्रतिष्ठित क्षेत्रांमधूनही गंभीर आरोप पुढे येत असल्याने समाजात मन सुन्न करणारे प्रकरण झाले.
टीसीएस नाशिक प्रकरण : कॉर्पोरेट क्षेत्रावरील प्रश्न
नामांकित आयटी कंपनीच्या नाशिक प्रकल्पात कर्मचार्यांवर कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ, लग्नाचे आमिष, धार्मिक दबाव यासंदर्भातील गुन्हे दाखल झाल्याने शहराच्या कॉर्पोरेट प्रतिमेलाही तडा गेला. काही आरोपींना अटक झाली, काहींवर कारवाई झाली आणि कंपनीने तपासात सहकार्य करत संबंधित कर्मचार्यांना निलंबित केले. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, सर्व आरोप अद्याप न्यायालयीन पडताळणीअंतर्गत आहेत.
म्हाडा आरक्षण घोटाळा
नाशिकमध्ये म्हाडाच्या आरक्षणातील जागांमध्ये क्षेत्र कमी दाखवणे, बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या-शिक्क्यांच्या माध्यमातून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला. अनेक बिल्डर, नगररचना विभाग, महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकार्यांवर संशय व्यक्त करण्यात आला. एसआयटी चौकशी सुरू असल्याने या प्रकरणामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरण : शिक्षण नगरीलाही धक्का
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट परीक्षेच्या पेपरफुटीत नाशिकचे नाव समोर आल्याने शहराच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का बसला. शिक्षण क्षेत्रातील विश्वास डळमळीत करणार्या घटनांत नाशिकचे नाव येणे चिंताजनक मानले जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळा- 2027 तयारी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींंची विकासकामे सुरू आहेत. रस्ते, गटार, जलवाहिन्या, गॅस पाइपलाइन, ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी एकत्रित कामे सुरू असली, तरी नियोजनाचा अभाव, उशीर आणि खोदकामामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांमध्ये आता एक नवा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे, इतक्या मोठ्या निधीच्या कामांत पारदर्शकता राहील का? पूर्वीच्या काही प्रकल्पांतील अनियमिततेच्या आरोपांच्या पाश्वर्र्भूमीवर सिंहस्थपूर्व कामे भविष्यात घोटाळा म्हणून चर्चेत येणार नाहीत ना, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र, याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपास, लेखापरीक्षण व प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता महत्त्वाची ठरणार आहे.
नाशिकची प्रतिमा वाचविण्यासाठी
अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाई, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम यंत्रणा, कॉर्पोरेट आणि शासकीय क्षेत्रातील पारदर्शकता, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करणे आणि सिंहस्थ विकासकामांवर कडक देखरेख, हे उपाय नाशिकची प्रतिमा पुन्हा उभी करण्यासाठी आवश्यक ठरू शकतात.
These stains are not good!