समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक जातात. जातात कशाला तर एक मिनिट भेटून दुसर्‍या गेटने रफूचक्कर होण्यासाठी लग्नाला जातात. भूक असते म्हणून जेवणार्‍याच्या खुर्चीमागे 20-20 मिनिटे उभे राहायचे. त्याला काही न बोलता जाणीव होते मागे कुणीतरी उभे आहे. तो बिचारा कसेतरी घास गिळतो आणि त्याला जेवायला जागा करून देतो. दोन्ही बाजूने दोन-तीन हजार आमंत्रणे आणि जेवायची सोय दोनशेची. हे कशासाठी? स्वतः वेड्यात निघायचे व नातेवाईक, प्रेमाच्या लोकांना वेड्यात काढून अपमानित करण्यापेक्षा दोन्ही बाजूने दोनशे जवळचे नातेवाईक बोलवा, शांतपणे शाही विवाह करा, पण नाही! हे असेच चालू राहील…
मांडव व दुसर्‍या दिवशी शुभमंगल सावधान! दोन दिवसांचा कार्यक्रम. पण आता घरोघरी केळवण नावाची नवीनच प्रथा सुरू झाली आहे. मग मेंदी. पाचशे लोक व लाखभर खर्च. मांडव हळद हा दुसरा दिवस व तिसर्‍या दिवशी लग्न. एक नाही, तर दोन लग्नांची हौस नवरदेव-नवरी करून घेतात. वैदिक व नंतर दुसरे लग्न हा अजब प्रकार आहे. शहरात बाहेरच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी वैदिक ठीक. ते वैदिकला हजेरी लावून घरी निघून जात. मग रात्री शहरातील लोकांनी मस्त आनंद घ्यावा यासाठी लग्न दुसर्‍यांदा. मूर्खपणाचा कळस झाला. लग्न दुपारी. मुहूर्त सरासरी एक वाजेचा, तरी सकाळी वैदिक सुरू ते दुपारपर्यंत चालते. मग तीनला परत लग्न. हा पोरकटपणा लक्षात घेतला जात नाही, हे दुर्दैवच आहे. बरं पैसेवाले लोक लग्न दूरवर ठेवतात. सामान्य गरीब नातेवाइकाचा विचारच नाही. हा बसने आला तर येथे कसा येईल? म्हणजे बसभाड्यात दोनशे खर्चायचे आणि विवाहस्थळी जाण्यासाठी तीनशेची रिक्षा करायची. तुम्ही श्रीमंत आहात, पण नातेवाईक तसे श्रीमंत नाहीत, याचे भानच विसरले आहेत. जवळच्यांना रात्री लग्न लावून दहा वाजता निघावे लागते व पहाटे घरी पोहोचावे लागते. अधूनमधून मोठे अपघात होतात, हे लक्षात घेतलेच जात नाही.
लग्नाआधी मुलगा- मुलगी बोलतात. लग्नापर्यंत दररोज तास-दोन तास मोबाईलवर बडबड करतात म्हणजे सभ्यताच संपली. दृष्टाद़ृष्ट वधू वरा न करणे, हे विसरून जमलं तर लगेच गप्पा-भेटीगाठी. लग्नाआधी छान ठिकाण बघून भावी पती- पत्नी फोटो काढतात. लग्ना लागण्याआधी ते फोटो मोठ्या
पडद्यावर दाखवतात. म्हणजे कोपर्‍यातील प्रदर्शन जाहीरपणे करण्याचा प्रकार आहे. याच फालतू गोष्टीमुळे अर्धेच शेवटपर्यंत संसार करतात. अर्धे कोर्टात चकरा मारतात व वेगळे होतात. आयुष्यभर नांदा सौख्यभरे संपले. लग्न करायला सर्वच घाबरतात, आनंदाची जागा चिंता घेते, पण हा कसा असेल? ही कशी असेल? सतत टेन्शन घेत असतात. कधीकधी बालविवाहाचे समर्थन करावेसे वाटते. चुकीचे समजायच्या आधीच गळ्यात धोंडा अडकवला जातो. तेथे घटस्फोटाचे प्रमाण एकदम कमी असते. समर्थन बरोबर नाही, पण अनुभवाने बोलायची वेळ आली आहे. जे लग्नाला थांबतात किंवा लेट येतात ते फक्त फोटो काढून वर-वधू पित्यावर उपकार केल्याचे दाखवतात, पण काढलेले अर्धे फोटो डिलिट केले जातात. यांना काय समजते समोरचे हुशार झाले आहेत.
पंतप्रधानांनी देशासमोरील संकटांची जाणीव करून दिली. लवकरच देश मोठे संकट बघणार आहे म्हणून सावध केले, तर चेष्टा करणारे जास्त सक्रिय झाले आहेत. आता तरी समजून घ्या व कोणतेही कार्यक्रम कमी गर्दीत करून देश व लोकांच्या पैशांची काळजी करा. अनेक समाजांनी बदल स्वीकारले. बरीच मंगल कार्यालये, लॉन्स मुख्य रस्त्यावरच असतात. सीझनमध्ये दररोजच लग्न असतात. त्या भागात राहणार्‍यांना डीजेचा दणदणाट ऐकावा लागतो. याबरोबरच ट्रॅफिक जॅम करून चार तास छळले जाते. हे लक्षात कधी घेणार? पण ज्याला त्रास होतो त्याने
कार्यक्रमाला जाऊ नये, असे सल्ले देणारेही आहेत. आम्ही सुधारणार नाही, तुम्ही सुधरा अशी प्रवृत्ती असते.
समाजाने आहेर घेणे बंद केले पाहिजे. लग्नपत्रिकेत खास टीप असते, भांड्यांचे व कपड्यांचे आहेर स्वीकारले जाणार नाहीत, पण स्वीकारले जातात. त्यापेक्षा रोखीचे पैसेच आहेर म्हणून द्या, असे लिहायला काय हरकत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *