खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची गुरुवारी (दि. 14) अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून आठ तास कसून चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 च्या सुमारास त्या मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ही चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरा बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले.
या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकार्यांनी चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेषतः नाशिकमधील शिवानिका संस्था या ट्रस्टमध्ये त्यांची भूमिका, अशोक खरात याच्याशी असलेले आर्थिक संबंध आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. याशिवाय, मागील काही काळातील त्यांचे दौरे, गुवाहाटी हॉटेल दौरा आणि खरातच्या संस्थांशी असलेले हितसंबंध यावरही तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरात याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि काळ्या जादूचे गुन्हे दाखल असून, त्याच्या आर्थिक साम्राज्यात चाकणकर यांचा सहभाग आहे का, याचा तपास ईडी करत आहे.
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यापूर्वी विशेष तपास पथक (एसआयटी) ने देखील त्यांची सहा तास चौकशी केली होती. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खरात यांच्याशी आमचे संबंध केवळ आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपुरते होते, कोणताही आर्थिक किंवा जमिनीचा व्यवहार आम्ही केलेला नाही, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांचीही नावे समोर आल्याने आगामी काळात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rupali Chakankar questioned by ED for eight hours