विधान परिषदेसाठी 9 ठिकाणी मतदान केंद्रे

प्रशासनाचे नियोजन : 18 जूनला मतदान, 22 ला मतमोजणी

नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्रे असतील.निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी जारी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (दि. 20) दिली.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर 18 मेपासून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. या निवडणुकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. उमेदवारांना साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी लागणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी पाच हजार रुपये अनामत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जासोबत किमान दहा मतदारांचे सूचक म्हणून समर्थन आवश्यक राहील.
मतदानासाठी नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, मालेगाव, चांदवड, कळवण आणि बागलाण येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर तहसीलदार हे केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहणार असून, नायब तहसीलदार आणि सहाय्यक महसूल अधिकारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हीव्हीटी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नेमले जाणार आहेत.
मतदान साहित्य वितरण, मतपेट्यांची अभिरक्षा आणि मतमोजणीसाठी पिंप्री सय्यद येथील शासकीय अभिरक्षागृह निश्चित केले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.

आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक
आचारसंहिता लागल्यामुळे विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता असल्याने मान्सूनपूर्व तयारी, सिंहस्थ आणि आपत्तीविषयक कामांना आचारसंहितेतून वगळावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सचिवांना पाठविला आहे.

622 मतदार ठरवणार आमदार
या निवडणुकीत नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका, विविध नगरपरिषदा, नगरपंचायती, तसेच देवळाली छावणी परिषदेतील सदस्य मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 622 आहे.

बॅलेट पेपरवर पसंतीक्रमाने मतदान
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरचा वापर होणार आहे. मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार असून, एकाच क्रमांकाचा पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांना दिल्यास मतपत्रिका बाद होणार आहे.

बेकायदा पोस्टर, बॅनरवर कारवाईचा इशारा
सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेवर विनापरवाना पोस्टर, बॅनर, झेंडे किंवा घोषणा लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट 1995 अंतर्गत कारवाई होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रमानुसार 25 मे रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. 22 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Polling stations at 9 locations for Legislative Council

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *