बालमृत्यू प्रकरणांवर जि. प.ची कारवाईची तयारी

निष्काळजी यंत्रणेला कारणे दाखवा नोटीस, प्रतिभा संगमनेरे यांचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा बालमृत्यू अन्वेषण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यात घडलेल्या बालमृत्यू प्रकरणांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. एकूण सहा बालमृत्यू प्रकरणांचे ऑडिट करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बालविकास विभागाचे प्रताप पाटील, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच संबंधित तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका आणि मृत बालकांचे नातेवाईक उपस्थित होते.
बैठकीत दिंडोरी, पेठ, बागलाण, येवला, इगतपुरी व सुरगाणा या तालुक्यांतील प्रकरणांचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. दिंडोरी, पेठ, बागलाण, येवला, इगतपुरी आणि सुरगाणा येथील प्रकरणांमध्ये उपचारातील दिरंगाई, संदर्भ सेवांतील विलंब आणि प्रशासकीय त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत एकूण सात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. यात गर्भवती मातांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, गंभीर बालकांना तातडीने उपचार व संदर्भ सेवा, कुपोषित बालकांचे सॅम व
मॅम वर्गीकरण, एनआरसी व व्हीसीडीसीमध्ये वेळेत भरती, पालकांचे प्रभावी समुपदेशन, नियमित गृहभेटी व तपासणी तसेच आरबीएसके अंतर्गत जन्मजात व्यंग असलेल्या बालकांचा डीईआयसी केंद्रात पाठपुरावा यांचा समावेश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट कडक इशारा दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनीही क्षेत्रीय स्तरावरील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
क्षेत्रिय पातळीवरील निष्काळजीपणा, उपचारात झालेला विलंब आणि गंभीर बाबी लक्षात घेऊन संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

District administration preparing to take action on child death cases

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *