मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरातील आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन संशयितांना देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. ही कारवाई 21 मे रोजी रमजानपुरा येथील अर्बन हेल्थ सेंटरजवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या पथकाने दोन पंचांसह सापळा रचून छापा टाकला. यावेळी वसीम शेख इस्माईल (वय 28, रा. पाचपंजतन चौक, हलिमा गार्डनजवळ, मालेगाव) याच्याकडून अंदाजे 25 हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्टल) जप्त करण्यात आला. तसेच मुशीर अली नूर अली सय्यद (वय 29, रा. जाफरनगर, गट नं. 4, नूर मशिदीजवळ, मालेगाव) याच्याकडून दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राउंड हस्तगत करण्यात आले. दोन्ही आरोपी बेकायदेशीररीत्या शस्त्र व दारूगोळा बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
Villager stabbed in Ramzanpur, two arrested with live cartridges