1,580 रुपये प्रतिक्विंटलने होणार खरेदी; कांदा उत्पादकांना दिलासा
लासलगाव : वार्ताहर
लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रब्बी कांदा 2026 साठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे. मंगळवार, 26 मे 2026 पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला प्रतिक्विंटल 1,580 रुपये दर लागू राहणार असल्याचे आदेश केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलमार्फत जारी करण्यात आले आहेत.
कृषी भवन,नवी दिल्ली येथून 25 मे 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन पत्रानुसार हा दर रब्बी कांदा खरेदीसाठी लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत केली जाणार असल्याची माहिती पत्रात नमूद केली आहे. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेला हा दरदेखील उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.
कांदा उत्पादक शेतकर्यांच्या मते, सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो 20 ते 25 रुपये इतका पोहोचला असून मजुरी, वाहतूक, औषधे, खतांचे वाढलेले दर आणि हवामानातील बदल यामुळे खर्च सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत 1,580 रुपये प्रतिक्विंटल दर शेतकर्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त होत आहे.
लासलगाव बाजार समिती परिसरात मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलने सुरू होती. बाजारात अनेक ठिकाणी कांद्याला 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. विविध अहवालांनुसार महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चाखाली गेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कांदा खरेदीसाठी ‘प्राइस स्टॅबिलायझेशन फंड’ अंतर्गत हस्तक्षेप वाढविण्यात आला असला तरी प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण अत्यल्प असल्याची टीका देखील होत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांदा बफर स्टॉक वाढवून बाजार नियंत्रणाचा प्रयत्न केला होता. शेतकरी संघटनांनी मात्र “उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव” निश्चित करण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे. कांद्याला किमान 2,500 ते 3,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याशिवाय शेतकर्यांना दिलासा मिळणार नसल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.
केंद्राने जाहीर केलेला प्रतिक्विंटल 1,580 रुपयांचा कांदा दर शेतकर्यांसाठी दिलासादायक असला, तरी तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरा आहे. आज कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि तो सतत वाढत आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव निश्चित करणे ही काळाची गरज आहे.
– जयदत्त होळकर संचालक, मुंबई व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
Onion procurement rates increased by NAFED, NCCF