रस्त्याचे काम रखडले, अपघातांत वाढ
सिडको : प्रतिनिधी
सिडकोतील केवल पार्क ते अंबड लिंक रोडदरम्यानचा अर्धा किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हा रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका आणि लोकप्रतिनिधी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 26 मधून सिडको, डीजीपीनगर क्र. 2 परिसरातून सातपूर व अंबड लिंक रोडला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे नेहमीच मोठी वाहतूक असते. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता असल्याने अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, केवल पार्कच्या पुढे सुमारे अर्धा किलोमीटरचा भाग वगळता उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ये-जा करणारी वाहने एकाच बाजूने मार्ग काढत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.या अपूर्ण रस्त्याबाबत शेतकरी आणि महापालिका यांच्यात वाद असल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील इतर ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवून महापालिकेने विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न सिंहस्थापूर्वी निकाली काढण्याची मागणी होत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या नागरी वसाहती असून सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणारे कर्मचारी, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी नियमित या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
केवल पार्क ते अंबड लिंक रोडवरील रखडलेले काम शेतकरी व महापालिका वादामुळे थांबले आहे. मात्र, संबंधित शेतकर्यांशी चर्चा करून मनपा आयुक्तांच्या माध्यमातून उर्वरित रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल.
– निवृत्ती इंगोले नगरसेवक, प्रभाग क्रमांक 26