2 ते 4 जूनच्या दरम्यान धडकण्याची शक्यता; उष्णतेची लाट कायम
नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागा (आयएमडी)ने यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) निर्धारित वेळेच्या आधी, म्हणजेच 26 मे रोजी केरळममध्ये दाखल होतील असा अंदाज वर्तवला होता. संपूर्ण देश या सुखद बातमीकडे आशेने डोळे लावून बसला असतानाच, ताज्या माहितीनुसार मान्सून अद्याप केरळममध्ये अधिकृतरीत्या धडकलेला नाही. हवामान विभागाच्या निकषांनुसार, निर्धारित हवामान केंद्रांवर सलग दोन दिवस ठराविक प्रमाणात पाऊस आणि वार्याचा योग्य वेग नोंदवला गेल्यावरच मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते. मात्र, हे निकष अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मान्सूनची केरळमधील एन्ट्री थोडी लांबणीवर पडली आहे. आता तो 2 ते 4 जूनच्या दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जरी मान्सूनचे अधिकृत आगमन अद्याप झाले नसले तरी, केरळममध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि वादळी वार्याचा ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, समुद्रात वार्याचा वेग जास्त असल्याने मासेमारी करणार्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुढील काही दिवस ही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.एकीकडे दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे उत्तर भारत मात्र भयंकर उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) सामना करत आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणासह उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांत तापमानाचा पारा 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. येथील नागरिक मान्सूनच्या आगमनाची आणि या जीवघेण्या उकाड्यातून मिळणार्या दिलाशाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, यावर्षी ’एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे देशातील एकूण मान्सून पर्जन्यमान सरासरीपेक्षा काहीसे कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवल्याने, पावसाच्या पुढील वाटचालीकडे आणि वितरणाकडे संपूर्ण देशाचे आणि विशेषतः बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे.
Arrival of monsoon in Kerala delayed