सुविधा नसताना बाजार हलवल्याचा आरोप, व्यापारी-शेतकर्यांचे 50 टक्के नुकसान झाल्याचा दावा
सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील ऐतिहासिक चौदा चौक वाड्यातील भाजीबाजार कोणतीही पूर्वतयारी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध न करता जबरदस्तीने स्थलांतरित करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते उदय सांगळे यांनी व्यापारी व शेतकर्यांसह नगरपरिषद कार्यालयात धडक देत मुख्याधिकारी अभिजित कदम यांना जाब विचारला. या स्थलांतरामुळे स्थानिक व्यापारी आणि शेतकर्यांचे सुमारे 50 टक्के आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
भाजपच्या शिष्टमंडळाने यावेळी बाजार स्थलांतरित करण्यात आलेल्या बचत गटांच्या मॉलबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित मॉलवर सुमारे 40 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत असताना तसेच बाजार समिती, व्यापारी आणि नगरपरिषद यांच्यात कोणताही लेखी करार नसताना बाजार हलविण्यात आल्याबद्दल सांगळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
हा मॉल पूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बचतगट संस्थेकडे आणि त्यानंतर पणन संस्थेकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगळे यांनी यावेळी वारंवार होणार्या स्थलांतरामुळे मुंबईसह बाहेरील व्यापार्यांनी सिन्नरच्या भाजीबाजाराकडे पाठ फिरवल्याचा आरोप केला. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसून आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर मुख्याधिकारी कदम यांनी चौदा चौक वाड्यातील जागेवर नवीन भाजीमंडई उभारण्याचा प्रस्ताव असल्याने बाजार तात्पुरता स्थलांतरित केल्याचे सांगितले.चर्चेनंतर भाजपच्या वतीने मुख्याधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. व्यापारी, बाजार समिती आणि नगरपरिषद यांच्यात त्रिपक्षीय लेखी करार करण्यात यावा, जेणेकरून भविष्यात व्यापार्यांना पुन्हा स्थलांतराचा सामना करावा लागू नये, अशी मागणी करण्यात आली. नवीन ठिकाणी तातडीने पाणी, शौचालय, वीज व सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. चेन स्नॅचिंगसारख्या घटना रोखण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक शैलेश नाईक, शीतल कानडी, देवा वाजे, सोनू पेखळे, चंदन गवळी यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
BJP aggressive over vegetable market relocation