तीन महिने मुदतवाढ; अवघे दोन हजार 771 मुलींचे लसीकरण
नाशिक : प्रतिनिधी
गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणार्या एचपीव्ही लसीकरणासाठी पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आपल्या किशोरवयीन मुलीला एचपीव्ही लस प्रामुख्याने द्यावी, असे आवाहन माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे.
गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणार्या एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला अनेक जिल्ह्यांत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
अफवा आणि गैरसमजामुळे अगोदरच लसीकरणाची संख्या कमी होती.त्यातच उन्हाळी सुट्यांमुळे लसीकरण कमी झाले. जिल्ह्यात तीन महिन्यांत एचपीव्ही लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; परंतु एचपीव्ही लसीकरणाला आता पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात तीन महिने पाच हजारांहून अधिक कर्मचारी राबवूनही आतापर्यंत केवळ 4 टक्के म्हणजे दोन हजार 771 मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही ग्रामीणसह शहरी भागात एचपीव्ही लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे राज्यातील चौदा वषार्ंपर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लस मोफत देण्यात येत आहे. एचपीव्ही लस मानवी पॅपिलोमा व्हायरसपासून संरक्षण करते, ज्या विषाणूपासून विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. या लशीने कर्करोगाविरुद्ध 90 टक्क्यांपर्यंत सरंक्षण मिळते, असे सांगितले जाते. गर्भाशय मुखाची नियमित तपासणी गरजेची आहे. या तपासणीत कर्करोगाचे लवकर निदान होऊन टाळता येऊ शकते.दर तीन ते पाच वर्षांनी ही तपासणी केली पाहिजे. गर्भाशय मुखाची तपासणी करण्याचे प्रमाण आपल्याकडे अत्यल्प आहे.
एचपीव्ही लसीकरण ऐच्छिक असल्याने आपल्या मुलीला ही लस द्यावी की न द्यावी, हा पालकांचा निर्णय असल्याने त्यांची संमती आवश्यक आहे. यामुळे अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. यासाठी पालकांनी सोशल मीडियावरील चुकीचे मेसेज आणि व्हिडिओमुळे गैरसमज न करता मुलीच्या भविष्याचा विचार करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उन्हाळी सुट्या आणि सोशल मीडियावरील एचपीव्हीबाबतचे मेसेज आणि व्हिडिओद्वारे चुकीच्या माहितीमुळे लसीकरणाबाबत गैरसमज पालकांमध्ये निर्माण झाला आहे. पण एचपीव्ही लसीकरणाला अजून तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांंनी आपल्या मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
– डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी
Did you give your teenage daughter the HPV vaccine?