महिलेचा खून करणार्‍या संशयिताला पोलिस कोठडी

पंचवटी : प्रतिनिधी
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या सुनीता विश्वकर्मा (उपनगर) या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदीकिनारी फेकून देणारा मुख्य संशयित आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी (वय 33, रा. राहुलनगर, उपनगर, नाशिक) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून ताब्यात घेतल्यानंतर आता आडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे व उपनगर पोलिस ठाण्याचे जयंत शिरसाठ यांनी शुक्रवारी (दि.19) संयुक्त पत्रकार परिषद घेत या अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्याचा छडा लावण्यात आल्याची माहिती दिली.
महिलेची ओळख पटवणे आणि आरोपीचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाची चक्रे फिरवत असताना उपनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार मिलिंद बागूल यांना त्यांच्या खास खबर्‍यांकडून अत्यंत गोपनीय व महत्त्वाची माहिती मिळाली. मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असून, तिचा प्रियकर गोपीनाथ गोसावी यानेच अनैतिक संबंधातून तिचा खून केला आहे आणि तो नाशिकमधून पळून गेला आहे, हे बागूल यांनी अचूक शोधून काढले.
तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्याचा वापर करून आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकल्या. आरोपी गोपीनाथ गोसावी याला कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ‘ट्रान्झिट रिमांड’अंतर्गत नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीनेे गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिस कोठडीदरम्यान या खुनामागील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 

Suspect in woman’s murder remanded to police custody

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *