एकनिष्ठ राहिल्याने सोशल मीडियावर जनतेचा कौल
नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षाशी फारकत घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एका बाजूला पक्ष सोडणार्या खासदारांच्या सोशल मीडिया फॉलोविंगमध्ये घट होत असल्याची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सोशल मीडिया अकाउंटला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळून 30 ते 40 हजार नव्या फॉलोअर्सची भर पडली आहे. पक्षनिष्ठा आणि ठाकरे कुटुंबाशी असलेली बांधिलकी यामुळे शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांकडून खा. वाजे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय घडामोडींनंतर मतदार आणि शिवसैनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेवर होत आहे. विशेष म्हणजे, पक्षातील
फुटीनंतर सोशल मीडियावर गद्दार, निष्ठा, उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहेत. या पार्श्वभूमीवर वाजे यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सना मिळणार्या लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. शिवसैनिकांमध्ये सध्या अशी भावना व्यक्त होत आहे की, संकटाच्या काळात पक्षासोबत उभे राहणार्या नेत्यांना जनतेकडून अधिक विश्वास आणि पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे खा. वाजे यांच्या वाढत्या सोशल मीडिया लोकप्रियतेकडे आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.
Vaze’s followers increased by 40,000 in two days.