चौफुलीवर दुकानांमध्ये घुसला, सुदैवाने अनर्थ टळला
दिंडोरी : प्रतिनिधी
पेठ शहरातील बलसाड रस्त्यावर शनिवारी (दि. 27) सायंकाळी सातच्या सुमारास एका मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाने चांगलाच थरार निर्माण केला. एसटी स्टँडकडून बलसाड रस्त्याने खडी फोडण्याचे मशीन असलेली ट्रॉली घेऊन हा चालक भरधाव वेगात निघाला होता. रस्त्यावरील वाहनधारकांना हुलकावणी देत या ट्रॅक्टरने चौफुली नजीक विरुद्ध दिशेला असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये थेट धडक दिली. या अपघातात दुकानांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा रस्ता नेहमीच दुचाकीस्वार आणि पादचार्यांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. ट्रॅक्टरचा वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याचे पाहून नागरिकांनी एकच आरडाओरड केला. त्यामुळे रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली आणि मोठा अनर्थ टळला.
पेठ शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी आणि बेशिस्त चालकांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. अनेक वाहनांना कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवलेले असून, हे दुचाकीस्वार गर्दीचा विचार न करता सुसाट वाहने दामटतात.
विशेष म्हणजे, अनेक ट्रॅक्टरवर अल्पवयीन मुले चालक म्हणून बसलेली दिसतात. यातील बहुतांश चालकांकडे वाहनांची कागदपत्रे किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) नसते.
जेव्हा एखादा अपघात घडतो, तेव्हा स्थानिक पातळीवर आपापसात समझोता करून प्रकरण दाबले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील या जीवघेण्या वाहतुकीला आणि मद्यधुंद वाहनधारकांना तातडीने आळा घालावा, अशी तीव्र मागणी आता पेठमधील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Drunken tractor driver creates a terrifying scene in Peth town.