ना. महाजन : ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ अभियान
नाशिक : प्रतिनिधी
वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी ‘हरित नाशिक’ उपक्रम ही लोकचळवळ व्हावी. या चळवळीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
‘उन्नत नाशिक अभियान’ आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणार्या कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक शहर आणि परिसरात ‘हरित कुंभ – हरित मॉन्सून’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फाशीचा डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, नगरसेवक श्याम बडोदे, दिनकर पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
गोदावरी, नंदिनी आणि कपिला या नद्या नाशिक शहराचे वैभव आहेत. या वैभवाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी हरित नाशिकसाठी आपले योगदान दिले पाहिजे. कचर्याचे वर्गीकरण केले पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकू नये. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर आपण स्वच्छता राखली पाहिजे. तसे केले तर आपला परिसर, शहर, राज्य आणि देश स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असे महाजन म्हणाले. प्रारंभी दिनकर पाटील यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. संदीप जाधव आणि शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सातपूर मनपा प्रभाग सभापती समाधान देवरे, नागरे, लता पाटील, सुधाकर बडगुजर आदींसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
‘Green Nashik’ should become a people’s movement.