चांदवड पोलिसांकडून दोन संशयितांना अटक
चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील तळेगावरोही शिवारातील एका विहिरीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनेचा चांदवड पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणामागे प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेला खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तळेगावरोही येथील शरद अशोक वाकचौरे (वय 19) हा तरुण 22 मे रोजी रात्री शिवारातील एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले होते. या प्रकरणी सुरुवातीला चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता.
पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रोशन तुकाराम वाकचौरे (वय 27) याला शरदचे त्याच्या परिचयातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने सचिन दत्तात्रय गाडे (वय 23) याच्या मदतीने शरदचा काटा काढण्याचा कट रचला. ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्याच्या बहाण्याने शरदला शेतात बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर या दोघांनी मिळून त्याला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडाल्याने शरदचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.
या धक्कादायक घटनेनंतर मृत शरदचे वडील अशोक शिवाजी वाकचौरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोशन वाकचौरे आणि सचिन गाडे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Youth murdered by being pushed into a well over suspicion of a romantic affair.