विशेष महासभा बोलवा; राष्ट्रवादीचे आयुक्त व नगरसचिवांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात 7 आणि 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना, तर गटनेत्या सीमा रंजन ठाकरे यांनी नगरसचिवांना स्वतंत्र निवेदने दिली आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे आणि पावसापूर्वी नालेसफाई व पाणी निचर्याची कामे योग्य प्रकारे न झाल्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. के. के. वाघ चौक, मिरची चौक, रेसकोर्स, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आदी भागांत रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली, तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नागरिकांना दोन दिवस शाळा बंद ठेवण्याची वेळ आली. अनेक रस्ते उखडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाइपलाइन फुटल्याच्या तक्रारीही वाढल्या असून, आरोग्य व वैद्यकीय सेवांवरही त्याचा परिणाम झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती दक्षता घेतली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागातील शहर अभियंत्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात
आली आहे.
तसेच, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे वाहनांचे नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, पाण्यात पडून जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च महापालिकेने उचलावा आणि घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेल्या कुटुंबांनाही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय, या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नाशिक महापालिकेची विशेष महासभा बोलावून संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
Public suffering due to the negligence of the Municipal Corporation