दोन दिवसांच्या पावसाने शहराची वाताहत

‘उबाठा’चा प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : प्रतिनिधी
येत्या सात दिवसांत शहरातील रस्त्यांवरील सर्व खड्डे न बुजविल्यास तसेच खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त न केल्यास शिवसेना मोठे जनआंदोलन छेडेल, असा इशारा ठाकरे गटाने मनपा प्रशासनाला दिला. शहराच्या या परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी महापालिकेची विशेष महासभा बोलवावी, अशी मागणी यावेळी शिवसेना उबाठा गटाचे गटनेते केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी
यांनी केली.
शहरात बुधवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा झाल्याने याविरोधात उद्धव सेना आक्रमक झाल्याचे दिसून आले. या प्रश्नावर गुरुवारी (दि.9) मनपा आयुक्तांसमवेत बैठक झाली. मनपाकडून कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. मनपा मुख्यालयात आयुक्तांंबरोबर झालेल्या
चर्चेनंतर मनपा आवारात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या कारभाराचा निषेध केला. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी जयंत दिंडे यांच्यासह नगरसेविका भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, योगेश भोर, बाळासाहेब कोकणे, सागर कोकणे, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, सचिन बांडे, स्वाती पाटील, शैलेश ढगे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी पालिकेच्या कारभाराचा पंचनामा करत परिस्थिती कधी सुधारेल, असा सवाल केला. शहरात पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेले ड्रेनेज, नागरिकांच्या घरांत शिरलेले पाणी, वाहतुकीचा खोळंबा आणि वार्‍यामुळे उन्मळून पडणारी झाडे, या प्रश्नांवर तातडीने चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी शहरातील प्रश्नांकडे लक्ष वेधत नाशिककरांचा अंत पाहू नका, असे म्हणत रस्ते तत्काळ दुरुस्त न झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यालाच तळ्याचे स्वरूप आल्याने आयुक्त, महापौरांना मुख्यालयातून बाहेर पडता आले नाही. शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवले असून, प्रशासन ठेकेदारांवर कुठलीही कारवाई करत नाही, शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेने सात दिवसांच्या आत शहरातील रस्त्यांसह इतर कामे केले नाही तर शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. – केशव पोरजे, गटनेते, उबाठा

 

Two days of rain wreak havoc in the city

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *