क्वेटा/श्रीनगर :
बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. ‘बलुचिस्तान प्रजासत्ताक’ या नावाने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आल्याचा दावा करणारे एक निवेदन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या या पत्रानुसार, बलुचिस्तानच्या लष्कराने या प्रदेशाचा 85 टक्के भाग ताब्यात घेतला आहे. तसेच, देशाचा ध्वज, राष्ट्रगीत, नवीन चलन आणि प्रशासकीय प्रणाली लागू केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पत्रानुसार, या प्रदेशातील खनिजे, गॅस क्षेत्रे आणि कोळसा खाणींवर नवीन सरकारचे पूर्ण नियंत्रण असल्याचेही म्हटले आहे. बलुचिस्तानला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांमधून मोठ्या संख्येने लोकांनी राजीनामे दिल्याचेही त्यात नमूद आहे. बलुचिस्तानमध्ये बर्याच काळापासून तणाव वाढत आहे.
पाकिस्तानविरोधात अनेक आंदोलने झाली आहेत. बलुच रहिवाशांनी आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. आता बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र घोषित केल्यानंतर पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे. व्हायरल झालेल्या पत्रातील दाव्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनेने किंवा मान्यताप्राप्त सरकारने अद्याप बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये हिंसाचार वाढला आहे. वांशिक बलुच बंडखोर आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. 5 जुलैपासून 109 दहशतवादी मारले गेले आहेत, ज्यात पाकिस्तान लष्कर, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि बलुचिस्तान पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शाबान’मधील 71 जणांचा समावेश आहे. तथापि, आता परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे.
Partition of Pakistan? An Independent Balochistan