एफडीए आयुक्त मुंढे यांचे तरुणांना आवाहन; बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?
मुंबई : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईला व्यापक जनसमर्थन लाभत आहे. मुंढे यांनी नुकत्याच एका विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी तरुणाईला केले आहे. महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतोच कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा माफिया आणि भेसळखोरांना मुंढेंनी कडक शब्दांत इशाराही दिला आहे.
या मुलाखतीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा बंदीची अंमलबजावणी, गुटखा माफियांचे जाळे, दूध भेसळ आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील कायद्याची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 2012 पासून बंदी आहे. मात्र, गुटखा माफियांनी आपली कार्यपद्धती बदलली असून, त्यांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बंदी असली तरी शेजारच्या राज्यांतून गुटख्याची तस्करी केली जात आहे. गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर या टोळ्यांनी आपले जाळे राज्याबाहेर विस्तारले. त्यामुळे पुरवठ्याचे स्रोत बदलले असले, तरी बेकायदेशीर व्यापार सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुटखा विक्रीप्रकरणी लहान टपर्यांवर कारवाई होताना दिसते. मात्र, मोठ्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, संबंधित कंपन्या राज्याबाहेरून संपूर्ण साखळी चालवत आहेत. मात्र, आता अशा कंपन्यांच्या मालकांनाही थेट गुन्ह्यात आरोपी केले जात असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवले जात आहेत.
मागणी थांबायला हवी
गुटख्याविरोधातील लढाई केवळ प्रशासनाने लढून उपयोग होणार नाही, असे सांगत मुंढे यांनी नागरिकांनाही आवाहन केले. लोकांनी स्वतःहून गुटखा खाणे बंद केले, तर मागणीच संपेल आणि मागणी नसल्यास पुरवठाही आपोआप थांबेल. गुटख्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याकडे तुकाराम मुंढे यांनी लक्ष वेधले.
Do not buy poison; do not ruin your life!