पर्यटक हल्लाप्रकरणी नऊ जणांना अटक

तीन जण फरार; प्रमुख संशयित खुनातील आरोपी

नाशिक : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द धबधबा परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून कारची तोडफोड, महिलेचा विनयभंग, मोबाइल व सोन्याची साखळी लुटण्याचा तसेच पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या एका दिवसात नऊ आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू यांचा शोध सुरू असून, आकाश भोईर याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
12 जुलै रोजी भावली खुर्द धबधबा परिसरात नाशिकरोड येथील पूनम किरण भागवत (वय 44) या पती किरण भागवत व कुटुंबीयांसह फिरण्यासाठी गेल्या असताना काही युवकांनी महिलेकडे पाहून शिट्टी वाजविल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हा प्रकार घडला.
आरोपींनी साथीदारांना बोलावून भागवत कुटुंबाचा बलेनो कार व दुचाकीवरून पाठलाग केला. कार अडवून बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक व लोखंडी रॉडने काचा फोडल्या. फिर्यादीचा विनयभंग करून सॅमसंग एस-24 अल्ट्रा मोबाइल व दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. तसेच किरण भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 166/2026 अन्वये खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, विनयभंग आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून विशाल मच्छिंद्र भटाटे (27, गिरणारे), अनिकेत गणेश मानवेढे (24, गिरणारे), अनिरुद्ध विठोबा भागडे (25, नांदगावसदो), सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (22, माणिकखांब), विनोद लक्ष्मण बोराडे (26, इगतपुरी गावठा), सचिन दत्तू आडोळे (29, माणिकखांब), अर्जुन चिंधू आडोळे (25, माणिकखांब), देवीदास कचरू भगत (25, बलायदुरी) आणि अजय भूषण दालभगत (20, देवळे-घोटी) यांना अटक केली.
दरम्यान, कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपी आकाश भोईर याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक श्रीमती विमला एम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, इगतपुरीचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित होते.

आकाश भोईर खून प्रकरणातील आरोपी

पर्यटकांवर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने हल्ला करणारा प्रमुख आरोपी आकाश भोईर याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. पोलिस त्याचा कसून शोध
घेत आहेत.

Nine arrested in connection with tourist attack case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *