– अनिल उदावंंत
पावसाळ्याचा पहिला महिना संपून दुसरा महिना सुरू झाला तरीही शेतकर्याला त्याच्या शेतात पेरणी करता आली नाही. हवामान खात्याकडून पाऊस लांबत असल्याच्या बातम्या आल्या. पाठोपाठ चोहीकडून संभाव्य दुष्काळाच्या बातम्या येऊ लागल्या. त्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. बेरोजगारी आणि वाढत्या महागाईनं आधीच होरपळलेल्या सामान्य जनतेला काळजी वाटू लागली. सरकारच्या डोक्यावर त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शेतकर्याच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं ओझं होतंच. त्यात या दुष्काळाच्या ओझ्याची आणखी भर पडणार असं वाटत होतं.
या पार्श्वभूमीवर कदाचित काही टँकर माफियांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील; पण अचानक सारं वातावरण बदललं. सर्वदूर चांगला पाऊस सुरु झाला. आता दुष्काळाचं सावट दूर होणार! या विचारानं समस्त सृष्टी, व्यष्टि आणि समष्टिला आनंद झाला. सर्वत्र चांगला पाऊस पडणार, नदी नाल्यांना पूर येणार, सर्व तळी, तलाव आणि धरणं तुडूंब भरणार! असं एक आश्वासक चित्र दिसू लागल्यावर सगळा शेतकरी वर्ग पेरणीच्या कामाला लागला.
शेतकरी मोठ्या कष्टानं आपल्या जमिनीची चांगली मशागत करीत असतात. निसर्गही त्यांना चांगली साथ देत असतो. पेरणीसाठी अनुकूल वातावरण झाल्यावर आपल्याला पेरणीसाठी योग्य व दर्जेदार बी-बियाणं पुरेशा प्रमाणात आणि सहज उपलब्ध व्हावं अशी शेतकर्याची रास्त अपेक्षा असते; मात्र अनेकदा तसं होत नाही. कधी त्याला निकृष्ट बियाणं मिळतं तर कधी त्याला चांगल्या बियाण्यासाठी जास्तीची किंमत मोजावी लागते. त्यातून काही शेतकर्यांना दाट-विरळ पेरणी आणि दुबार पेरणीसारख्या संकटाला तोंड द्यावं लागतं.
अशावेळी मला संत तुकाराम महाराजांच्या एका अभंग ओळीची आठवण येते. ते म्हणतात- ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज। कैचे लागे निज हाता तेथे॥ म्हणजे एखाद्या शेतकर्याने उत्तम प्रकारे आपली जमीन तयार केली. पाऊसही वेळेवर पडला. माती सुपीक आहे. पुरेसे खत-पाणी उपलब्ध आहे. अशावेळी त्याने जर चुकीचं बी पेरलं, तर त्याच्या हातात चांगलं पीक कसं येईल? असा प्रश्न संत तुकारामांनी या अभंग ओळीतून विचारला आहे.
वाचकहो, मानवी आयुष्याची गोष्टही काहीशी अशीच असते. आपल्या आजूबाजूला अशी सर्व परिस्थिती अनुकूल असलेली अनेक माणसं असतात. सगळं अनुकूल असूनही केवळ पेरणी चुकल्यामुळं काही माणसं त्यांच्या आयुष्यात मोठं नुकसान झेलत असतात.
दहावी-बारावीच्या परीक्षेत उच्चतम गुण मिळविणार्या हजारो विद्यार्थ्यांपैकी शेकडो विद्यार्थ्यांची कहाणी यापेक्षा फारशी वेगळी नसते. दहावीला उत्तम गुण मिळवून सरकारी तंत्रनिकेतनात प्रवेश घेतलेला माझ्या माहितीतला एक अत्यंत हुशार विद्यार्थी कॉलेजात गेल्यावर बिघडला. तिथं त्याला चांगली संगत मिळाली नाही. तो प्रेमाच्या एका घातकी विळख्यात अवेळी अडकून अक्षरशः वेडा झाला. आयुष्यभर वेडा म्हणून जगणंच त्याच्या वाट्याला आलं.
स्वतः पेशानं डॉक्टर असलेली एक तरुण मुलगी दवाखान्यातल्या एका डॉक्टरच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. पुढे तो मुलगा डॉक्टर नसून वॉर्डबॉय आहे हे तिला कळतं; तेव्हा तिच्या आयुष्याचं अगदी मातेरं झालेलं मी जवळून पाहिलं आहे.
आयटीतल्या एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारा एक तरुण एक दिवस अचानक मौन होतो. तो कुणाशीच काही बोलेनासा होतो. त्याला बोलतं करण्याचे अनेक प्रयत्न अथकपणे करूनही तो काहीच बोलत नाही. त्याच्यातल्या या आकस्मिक बदलामुळे कंपनी त्याला कामावरून काढण्याची नोटीस देते. तरीही तो तरुण काहीच बोलत नाही. अखेर कंपनी त्याला कामावरून काढून टाकते. एका उच्चस्तरीय बैठकीत बोलत असताना त्या तरुणाला अश्लाघ्य पद्धतीने अपमानित करून गप्प बसवण्यात आलं होतं. त्या गोष्टीचा अतिरेकी विचार करून त्या तरुणानं कायम मौन राहण्याचा अघोरी निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानं त्याचं करिअर नष्ट केलं. अशावेळी आपल्या एकुलत्या तरुण मुलाच्या आयुष्याचं असं विराण वाळवंट होताना पाहून त्याच्या कुटुंबावर काय बेतलं असेल?
या सगळ्या उदाहरणांतील तरुणांकडे प्रतिभेची मुळीच कमतरता नव्हती. त्यांच्या करिअरसाठी लागणार्या संधीही त्यांना मिळाल्या होत्या. कोणतीही परिस्थिती त्याच्या विरोधात नव्हती. सर्व काही त्यांना हवं तसं व अनुकूल होतं. असं असताना काही अयोग्य सवयी, व्यसनं आणि चुकीच्या निर्णयांचं बीज त्या सुपीक जमिनीत पडलं आणि त्याचे व्हायचे तेच परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झाले.
आजकाल अनेक तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात असं घडताना दिसतंय. त्यांच्याकडे चांगलं शिक्षण असतं, त्यांची क्षमताही चांगली असते, त्यांच्या कुटुंबातून त्यांना चांगला आधार मिळत असतो. पण चुकीची संगत, त्यामुळे घडणारी चुकीची पंगत, त्यातून लागणारी निरनिराळी व्यसनं व त्यांचं शारिरीक, मानसिक, सामाजिक व आर्थिक आरोग्य सर्वार्थानं बिघडवणार्या सवयी यामुळं त्यांचे निर्णय चुकतात आणि त्यांचं आयुष्य भरकटतं.
अशा रीतीनं एखाद्याचं आयुष्य भरकटत असेल तर त्याचा दोष केवळ नशीब, नियती, प्राक्तन किंवा सटवाईलाही देता येत नाही. इथं खरा दोष असतो तो त्यांनी त्यांच्या आयुष्यात पेरलेल्या बीजाचा! तुमच्या आयुष्याची जमीन कितीही सुपीक असली, तुम्हाला कितीही मोठ्या संधी उपलब्ध असल्या, तरी तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जमिनीत कोणतं बीज पेरताय, यावरच तुमच्या आयुष्याचं पीक कसं येणार हे अवलंबून असतं.
आयुष्याची आपल्या वाट्याला आलेली जमीन आपल्याला बदलता येत नाही. हे खरं असलं तरी, त्या जमिनीत योग्य आणि दर्जेदार बीज पेरण्याचा निर्णय मात्र प्रत्येक क्षणी आपल्याच हातात असतो. हे कधीच आणि कुणीच विसरता कामा नये.
What kind of seed are you sowing in life?