आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन

अचानक सरींनी उडविली विद्यार्थी, नागरिकांची तारांबळ

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने उकाडा आणि दमट वातावरणाने हैराण झालेल्या नाशिककरांना शुक्रवारी अखेर दिलासा मिळाला. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावपळ उडाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना छत्री किंवा रेनकोट नसल्याने आसरा शोधावा लागला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शहरात उष्णता आणि दमटपणा वाढला होता. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. शहरातील विविध भागांत काही काळ जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच दुचाकीस्वारांची काही काळ गैरसोय झाली.
दिवसभरात 1.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आणि दिवसभर गारवा जाणवत राहिला.
शहरात पावसाने पुनरागमन केले असले तरी जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक भागांत पेरणीनंतरच्या पिकांना पावसाची गरज असून, शेतकर्‍यांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Rain returns after a week-long break

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *