उन्हाळ्याची उष्णता वाढली की ढग दाटून पावसाळा सुरू होतो. साधारणपणे जूनच्या पहिल्या अठवड्यानंतर आपल्याकडे मान्सून सुरू होतो; परंतु गेल्या एखाद दशकापासून हळूहळू ऋतू पुढे ढकलले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे खरे आगमन जुलै महिन्यापासून होते. पाऊस येताच वातावरण थंडावते, परंतु उत्साह वाढतो. निसर्गात नवचैतन्य निर्माण होते. सगळीकडे हिरवळ पसरते. डोंगरदर्या आपल्याला खुणवायला लागतात. पहिल्या-दुसर्या पावसाचा आनंद भलेही आपण आपल्या घरातच चहा, कॉफी, भाजलेल्या शेंगा, मक्याचे कणीस, भजी व इतर गरमागरम तळण तुळण करून मान्सूनचे स्वागत करतो, परंतु नंतरचे पाऊस एन्जॉय करण्यासाठी मान्सून ट्रिपचे प्लॅनिंग करतो. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये फॅमिली, मित्र किंवा सहकार्यांसोबत एखादी पावसाळी सहल काढतो. मस्त एन्जॉयही करतो. त्या सर्व आठवणी कायम लक्षात राहतातही. मग दर वर्षीच्या आठवणींच्या चर्चा आपल्याला पुन्हा चेतना देत असतात. परंतु, या आठवणी गोड असाव्यात, कायम लक्षात राहण्यासारख्या असाव्यात, कटू वा क्लेशदायक नसाव्यात, याची खबरदारी घेतली पाहिजे. कुठलीही ट्रिप, सहल, पार्टी करण्यापूर्वी या गोष्टी कायम लक्षात असू द्या, काही नियम घालून घ्या.
सध्या नाशिक शहर आणि लगतच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सिंहस्थाची पूर्वतयारीची कामे सुरू आहे, अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम असतात, पाणी साठलेले असते, मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत, रस्त्यावर चिखल साठल्याने रस्ते निसरडे झालेले आहेत. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मागील 15 दिवसांत तीन बाइकवाले माझ्या गाडीच्या समोर चालता चालता स्कीड झाल्याचे मी बघितले. त्यातील एक ताई तर माझ्या गाडीच्या खाली येता येता वाचली. चारचाकी वाहनधारकांनी याची खबरदारी घ्यावी. मानेचे, कमरेचे आजार असणार्यांना खड्ड्यांमुळे त्रास वाढू शकतो. संधिवात रुग्णांच्याही तक्रारी पावसाळ्यात, ढगाळ वातावरणामुळे आणि पावसात भिजून गारठल्याने वेदना अधिक तीव्र होतात, सूज वाढते आणि सांध्यांचे जखडणे, ताठरपणा येणे असे प्रकार वाढतात.
ही झाली आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी. पावसाळा म्हटला की फिरणे, ट्रीपला जाणे, मौजमजा करणे आलेच. अशासाठी तुम्हाला जिथे जायचं असेल, तिथली परिस्थिती जाणून घ्या, जसे नेमके लोकेशन, तिथे जाण्यासाठीचे रस्ते, दळणवळणाचे इतर साधन जसे बस, रेल्वे, फ्लाइट, बोट, प्रायव्हेट गाड्या… इ. राहण्याची सोय, हॉटेल्स, जवळचे मार्केट, तुम्ही जाणार आहात त्यावेळचे तिथले वातावरण, पावसाचे प्रमाण, मागील काळात काही दुर्घटना झाली आहे किंवा नाही, वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक जॅम), पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने जारी करण्यात आलेल्या काही सूचना, तिथले धोक्याची ठिकाणं, सुरक्षिततेच्या सुविधा यांसारख्या अनेक बाबींचा विचार करूनच ट्रिप प्लॅन करा. अगदी ट्रीपला निघतानाही या बाबतीतील अपडेट्स घ्या. शनिवार, रविवार टाळून जाता आले तर उत्तमच. कारण जसे तुम्हाला सोयीचे वाटते, तसे इतरांनाही ते सोयीचे असल्याने तिथे खूप जास्त गर्दी होते. मग आपली गैरसोय होते. गेल्या रविवारीच लोहगडावर जसे हजारो पर्यटक अडकून पडले, सुविधा कमी पडल्या, लोकांना त्रास झाला, असे होता कामा नये. सुदैवाने, कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही किंवा तसा प्रसंगही उद्भवला नाही.
धरण, धबधबा, नदीकिनारी, सागरकिनारी सहलीला जात असाल तर पाण्यापासून सावध रहा. पाण्याच्या ताकदीला कमी लेखू नका. पावसाळ्यात धरणात गाळ साठतो, त्यामुळे खोल पाण्याच्या गाळात जीवाला धोका होऊ शकतो. धबधब्याखाली जाताना विशेष काळजी घ्या, पडणार्या पाण्याचा जोर, हवा, शेवाळलेले दगड, तळ, वाहणार्या पाण्याचा जोर, अचानक जोराचा पाऊस आल्याने पाण्याचा वाढलेला जोर आणि पातळी, यामुळे दुर्घटना होतात. त्यात पुन्हा सेल्फी, फोटो, व्हिडिओ शूट करण्याचा मोह जीवघेणा ठरू शकतो. नदी असो की समुद्र, पाण्याशी खेळ हा धोकादायकच. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ नका, हिरोगिरी करू नका. असे वागणे जीवाशी येते. आपल्यासोबत असलेल्या महिला, वृद्ध आणि लहान मुलांना जपा. त्यांची विशेष काळजी घ्या. कपडे, जेवण, पिण्याचे पाणी, बिस्कीट, चिवडा असे काही पदार्थ सोबत असू द्या. निर्जन स्थळी जाण्याचे टाळावे. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.
नाशिकच्या नजीक असणारे कसारा, आंबोली, वणी, भंडारदरा, माळशेज घाट तरुणाईला खुणावत असतात. मित्रमैत्रिणींसोबत ग्रुप करून फिरायला जाणे, यासारखी मज्जा नाही. सुट्टीच्या दिवशी कॉलेजची मुलं आणि काही अतिउत्साही मंडळी घाटात पावसाची मजा लुटायला जातात. घाटातील वेडीवाकडी वळणे, धुके, पाऊस एन्जॉय करतात. वळणावळणावर असलेल्या धबधब्यांची मजा लुटण्याशिवाय तरुणाईला चैन पडणार नसतो, म्हणून ते पाऊस आणि धबधब्याखाली भिजण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी दरड, दगड कोसळतात. तरी, या बाबतीत विचार करूनच पाण्याखाली भिजावे. दुसरे महत्त्वाचे असे की, घाटात गाडी थांबवताना आपली गाडी रस्त्याच्या अगदी कडेला उभी करावी, जेणेकरून ये-जा करणार्या वाहतुकीला आपल्या गाडीची अडचण होणार नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. काही मंडळी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून डीजेवर बेफामपणे नाचत असतात. त्यांना आजूबाजूच्या ट्रॅफिकची चिंता नसते. त्या ट्रॅफिकमध्ये एखाद्याला त्याच्या महत्त्वाच्या कामानिमित्त पुढे कुठे जायचं असेल, असा साधा विचारदेखील लोक करत नाहीत. आपण सुज्ञ आहात, आपण असे काही करणार नाही याची मला खात्री आहे.
आपली ट्रिप यादगार व्हावी म्हणून, आपण ते सर्व क्षण कॅमेर्यात टिपण्याचा प्रयत्नात असतो. मग त्यात आपण निसर्गाचा फोटो काढतो, ग्रुप फोटो काढतो, सिंगल फोटो काढतो किंवा सेल्फी घेतो. इतर सर्व फोटो घेण्यात काही गैर नाही, परंतु सेल्फी घेताना गल्लत होऊ शकते. चांगला फोटो यावा म्हणून आपण पाण्याच्या अगदी जवळ, कड्याच्या टोकाला, उंचावर, पुलावर, गाडीच्या टपावर किंवा अगदी तिरपे-तारपे उभे राहून सेल्फी काढण्यात दंग असतो. अशा वेळी स्वतःचा तोल जाऊन खाली पडण्याच्या अनेक घटना यापूर्वी झाल्याच्या तुम्ही ऐकल्या असतील. दरीत, पाण्यात, दगडावर किंवा गाडीखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. फोटो काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा जिथे आहात तिथले निसर्गसौंदर्य प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवल्याने अधिक आनंद आणि समाधान मिळेल. वाहणार्या पाण्याची अन् हवेची, पडणार्या पावसाच्या थेंबांची, नजरेसमोरील धुक्याची अनुभूती घ्या. डोंगर, दर्या, झाडी, वेली, पाने, फुले, पक्षी, प्राणी बघा, त्याच्यात आनंद शोधा. धबधब्याच्या पाण्यातून उडणारे तुषार, त्याने तयार होणारे इंद्रधनुष्य अनुभवता येते. खळखळ वाहणार्या पाण्याचा आवाज ऐका, पक्ष्यांचा आवाज ओळखा, हवेत उडणारे ढग बघा. मिनिटा-मिनिटाला बदलणार्या वातावरणाचे साक्षीदार व्हा. कधी धुके, तर कधी ऊन, इतक्यात पाऊस तर क्षणात कोरडे. हा अनुभव आयुष्यात विसरू शकत नाही.
विरंगुळा, मौजमजा, टाइमपास, चेंज, दोस्तीयारी, एन्जॉयमेंट, मस्ती, धमाल या गोष्टींना आणखी एका गोष्टीची सांगड घातली जाते. अशा वेळी, मद्यपान, धूम्रपान आणि मादक पदार्थांचे सेवन करून मौजमजेत आणखी भर पडावी, अशा हेतूने नशाबाजी केली जाते. सहलीला जायचे म्हणजे मद्यपान केलेच पाहिजे, असा काही नियम नाही, तरीही अनेक तरुण-तरुणी (हो तरुणीही) हल्ली नशा करताना दिसतात. विशेष करून फक्त मुलं किंवा पुरुष मंडळी एकत्र ट्रीपला जाताना मद्यपान करतात. रस्त्यावर, गाडीतून हुल्लडबाजी करतात, भररस्त्यात डीजे लावून नाचतात, हॉटेल किंवा ट्रॅफिकमध्ये दंगा करताना दिसतात. मद्यपान करणार्यांनी लक्षात ठेवावे की, सहलीला फक्त आपणच आलेलो नाही, इतर लोकही आलेले आहेत, काही फॅमिलीसोबत असतील तर महिलांचा एखादा ग्रुप असेल, लहान मुलं असतील, शाळेची सहल असू शकते. त्यांना तुमचा त्रास आणि अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. दारूच्या नशेत रस्त्यावर गाडी चालवणे, पाण्यात, धरणात, धबधब्याखाली उतरणे, डोंगरकड्याच्या कोपर्यावर उभे राहणे जीवघेणे ठरू शकते. नशेत उंच-खोल, लांब-जवळ, वेग-जोर, याचा अंदाज चुकतो, म्हणून दुर्घटना होतात. तुमची ट्रिप अविस्मरणीय व्हावी, यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. लहान मुलांना एकटे जाऊ देऊ नका, एखादा शहाणा / समजदार व्यक्ती सोबत पाठवावा. घरी आपली कुणीतरी वाट बघत आहे, याची आठवण मात्र नेहमी असू द्या… तुम्हाला पावसाळ्याच्या शुभेच्छा…!
Monsoon is here… avoid accidents.