पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद

 

काळ्याकुट्ट ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा तो वेड लावणारा सुगंध… हे सगळं अनुभवायला किती छान वाटतं, नाही का? या आल्हाददायक वातावरणात चिंब भिजण्याचा मोह आवरता येत नाही. पण, निसर्गाच्या या उत्सवासोबतच काही नकोसे पाहुणेही आपल्या घरात आणि शरीरात प्रवेश करतात. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारखे संसर्गजन्य आजार, त्वचाविकार आणि सांधेदुखीचा त्रास याच काळात
डोके वर काढतो.

आपल्या लाडक्या पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटायचा असेल, तर शरीराला आयुर्वेदाची प्रेमळ साथ देणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग, जाणून घेऊया पावसाळ्यात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्याचे काही सोपे पण बहुमोल आयुर्वेदिक उपाय.
सांधेदुखी आणि पचनाच्या तक्रारी का वाढतात?
पावसाळ्यामध्ये निसर्गातील बदलांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. उन्हाळ्यात शरीरात साठलेला ‘वात’ पावसाळ्यातील थंड आणि दमट हवेमुळे प्रकुपित होतो. तसेच, या दिवसांत आपली पचनशक्ती (ज्याला आयुर्वेद ‘अग्नी’ म्हणतो) स्वाभाविकपणे मंदावते.
अन्न नीट न पचल्यामुळे शरीरात आम तयार होतो. हा आम आणि वाढलेला वात एकत्र येऊन सांध्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे सांध्यांना सूज येते, कडकपणा जाणवतो आणि सांधेदुखीचा (आमवात)
त्रास वाढतो.
पावसाळ्यात दूषित पाणी, हवा आणि अन्नामुळे आजारांचा धोका सर्वाधिक असतो. टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो आणि कावीळ यांसारखे आजार प्रामुख्याने दूषित पाणी आणि अन्नामुळे होतात.
डेंग्यू (एडिस इजिप्ती डास), मलेरिया (अ‍ॅनोफिलीस डास) आणि चिकनगुनिया हे साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढते.
साचलेल्या दूषित पाण्यातून चालल्यास किंवा जखमेचा पाण्याशी संपर्क आल्यास लेप्टोस्पायरोसिस हा आजार होऊ शकतो.
हवेतील आर्द्रतेमुळे सर्दी, खोकला आणि घशाचे संसर्ग वेगाने पसरतात.
काय खावे, काय टाळावे?
आपली पचनसंस्था या काळात नाजूक असते, त्यामुळे आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेवण नेहमी ताजे, गरम आणि पचनास हलके असावे. आहारात साजूक तुपाचा आवर्जून वापर करा.
पावसाळ्यात साध्या पाण्याऐवजी उकळून कोमट केलेले पाणी प्यावे. सुंठ सिद्ध जल (पाण्यात सुंठ उकळून तयार केलेले पाणी) सांध्यांसाठी आणि पचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. रोजच्या जेवणात आले (सुंठ), लसूण, ओवा, जिरे, हिंग आणि मिरे यांचा वापर वाढवा. हे पदार्थ पचनशक्ती (अग्नी) प्रज्वलित करतात आणि शरीरातील वात कमी करतात. वातुळ पदार्थ (हरभरा, वाल, मटार), शिळे अन्न, अति थंड पाणी, उघड्यावरचे पदार्थ, अति तेलकट, कोल्ड्रिंक्स आणि पचनास जड असणारे मैद्याचे व तळलेले पदार्थ खाणे टाळा.
त्वचा आणि केसांची निगा
हवेतील ओलाव्यामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. खाज सुटणे, फंगल इन्फेक्शन (गजकर्ण), मुरुमे आणि केस गळणे.
पावसाच्या सांडपाण्यात चालणे झाल्यास घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवावेत. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्यास त्वचाविकार आणि फंगल इन्फेक्शन दूर राहते.
केसांच्या समस्यांसाठी आठवड्यातून एकदा केसांना कोमट तेलाने (थोड्या भीमसेनी कापरासह) हलक्या हाताने मालिश करा. केमिकलयुक्त शॅम्पूऐवजी शिकेकाई, रीठा आणि आवळा वापरल्यास केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते. ओले केस बांधू नका, ते नैसर्गिकरीत्या सुकू द्या.
सर्दी – खोकल्यासाठी तुळशीचा चहा किंवा पारिजातक, काळी मिरी, आले आणि गूळ टाकून केलेला काढा घ्यावा. ताप आल्यास लंघनफ(हलका आहार/उपवास) उत्तम.
डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात कडुनिंबाची पाने, गुग्गुळ, वेखंड, ओवा आणि राळ यांचे धूपन करावे.
सांधेदुखी असणार्‍यांनी अंगाला कोमट तीळ तेल लावून मसाज (अभ्यंग) करावा व वाफ (स्वेदन) घ्यावी. वाढलेला वात मुळापासून कमी करण्यासाठी बस्ती ही सर्वश्रेष्ठ चिकित्सा मानली जाते (उदा. गुडघेदुखीसाठी
जानू बस्ती).
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात सुवर्णप्राशन अत्यंत उपयुक्त ठरते. या वर्षा ऋतूत वैद्यांचा सल्ला घ्या आणि निसर्गाच्या चक्रानुसार आपल्या जीवनशैलीत थोडे सकारात्मक बदल करून पावसाळ्यातील आजारांना सहज दूर ठेवू शकतो. पचनाला जपणे, वाताचे शमन करणे आणि
आयुर्वेदाचा अवलंब करणे, हाच खर्‍या अर्थाने पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करण्याचा मार्ग आहे!

Monsoon-related Illnesses and Ayurveda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *