जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; आ. कोकाटेंकडून निपटारा

भूसंपादन, जलजीवन मिशन, महावितरण, घरकुल, अनधिकृत वृक्षतोडीच्या तक्रारींवर चौकशीचे आदेश

सिन्नर : प्रतिनिधी
प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या. रविवारी (दि.26) शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे झालेल्या जनता दरबारात महसूल, महावितरण, ग्रामपंचायत, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख, नगरपालिका आदी विभागांशी संबंधित तक्रारींचा अक्षरशः भडिमार झाला. आमदार माणिकराव कोकाटे यांनी अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करत नागरिकांना दिलासा दिला, तर उर्वरित प्रकरणांवर संबंधित विभागांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

जनता दरबारात वडगाव सिन्नर येथील अनधिकृत वृक्षतोड, ठक्कर बाप्पा योजनेतील निकृष्ट कामे तसेच पाणीपुरवठा विहिरीच्या खोदकामातील अनियमिततेकडे राजेंद्र चव्हाणके यांनी लक्ष वेधले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आमदार कोकाटे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
कुंभमेळ्यासाठी वडगाव पिंगळा व चिंचोली शिवारातून जाणार्‍या राज्य मार्ग क्रमांक 37 च्या भूसंपादनाबाबतही नागरिकांनी आक्षेप नोंदवला. सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमिअभिलेख विभागाच्या संगनमताने शेतकर्‍यांचे गोठे, घरे, पोल्ट्री शेड व इतर मालमत्तांचा योग्य समावेश न करता भूसंपादन करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार कोकाटे यांनी दिले. जलजीवन मिशनच्या अनेक योजना अपूर्ण असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचाही आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश कोकाटे यांनी दिले. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात बाकी असलेली कामे ठेकेदारांकडून तात्काळ करून घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. जीवन प्राधिकरणाच्या अनेक योजना थकीत वीजबिलांमुळे बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. ही बिले संबंधित गावांच्या मुद्रांक शुल्क निधीतून अदा करण्याबाबत तसेच ग्रामपंचायती बरखास्त असलेल्या ठिकाणी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या समित्या स्थापन करून योजना सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गरज असेल तिथे पाणीपुरवठा योजनांना सोलर बसवण्याचे आदेशित केले.
महावितरणच्या अनेक तक्रारींचेही त्यांनी जागेवरच निराकरण केले. शिवरस्त्यांच्या समस्यांबाबत तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. तर स्वस्त धान्य न मिळणार्‍या नागरिकांची नावे लिहून घेत वंचितांना स्वस्त धान्याचा लाभ देण्यास तहसीलदारांना सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा, माणिक गाडे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, मुख्याधिकारी अभिजित कदम, महावितरणचे उपअभियंता विठ्ठल हारक, हेमंत बनसोडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक प्रदीप गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हितेश मोरे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अंकित जाधव, माजी बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, सहाय्यक निबंधक संजय गिते, पुरवठा निरीक्षक विवेक जमधडे, भाजपाचे नेते जयंत आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष कदम, शहराध्यक्ष सुभाष कुंभार, युवक तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, स्वच्छता व आरोग्य सभापती ललिता हांडे, नगरसेवक अजय गोजरे, सुनील गवळी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अंध महिलेच्या घरकुलाची समस्या निकाली

जनता दरबारातील एका हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांना भावुक केले. पूर्णतः दृष्टिहीन असलेल्या एका महिलेने घरकुल नसल्याची व्यथा मांडताच आमदार कोकाटे यांनी तत्काळ समाजकल्याण अधिकार्‍यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित महिलेला प्राधान्याने घरकुल मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Flood of complaints at ‘Janata Darbar’; MLA Kokate resolves issues.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *