त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत खंडित वीज अन् पाणीटंचाई

नागरिकांसह भाविकांचे हाल; प्रशासकीय निष्काळजीमुळे संताप

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
पवित्र त्र्यंबकनगरीत गेल्या आठवड्याभरापासून वीज आणि पाणी या अत्यावश्यक सुविधा कोलमडल्याने स्थानिक नागरिक व भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. दररोज 40 ते 50 हजार भाविकांची वर्दळ असलेल्या या शहरात प्रशासकीय निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरून काम करत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागासह नगर परिषदेचे बहुतांश वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने आणि अंबोली धरणावरील ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने अनेक दिवस नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली, तर आषाढी एकादशी व द्वादशीला उपवास सोडण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते.
प्रशासनाची वॉटर एटीएम गाडी डिझेल आणि पाण्याच्या अभावामुळे कुचकामी ठरली, परिणामी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागले.

साधू-महंतांचा तीव्र संताप

या परिस्थितीवर आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, जिल्हा प्रशासन मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. दररोज 50 हजारांहून अधिक नागरिक व भाविकांची उपस्थिती असताना वीज-पाण्याची ही दयनीय अवस्था चिंतेची बाब असून, जिल्हाधिकार्‍यांनी यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Interrupted power supply and water shortage in the Trimbakeshwar Kumbh Mela town.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *