नाशिक शहर युद्धपातळीवर खड्डेमुक्त करा

आमदार देवयानी फरांदे यांच्या सूचना; महापौर, आयुक्तांसोबत पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी महापौर हिमगौरी आडके-आहेर व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमवेत शहरातील विविध प्रमुख रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आमदार फरांदे यांनी शहरातील सर्व खड्डे युद्धपातळीवर तातडीने भरून संपूर्ण नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. नागरिकांना वाहतुकीचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी खड्डे भरण्याची कामे प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार फरांदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर मॅस्टिक अ‍ॅस्फाल्ट या अत्याधुनिक डांबरी तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, हे विशेष प्रकारचे कोल्ड मिक्स डांबर मिश्रण असून ते पावसाळ्यातही प्रभावीपणे वापरता येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत हे मिश्रण ओल्या वातावरणातही चांगले चिकटते, खड्ड्यांमध्ये घट्ट बसते आणि दीर्घकाळ टिकाऊ दुरुस्ती करण्यास मदत करते. त्यामुळे वारंवार त्याच ठिकाणी खड्डे पडण्याचे प्रमाण कमी होते. तसेच हे मिश्रण तयार अवस्थेत उपलब्ध असल्याने ते तातडीने वापरता येते आणि वाहतूक फार काळ बंद ठेवावी लागत नाही. मुंबई महानगरपालिकेने अशा प्रकारच्या आधुनिक डांबरी तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळ्यातही जलद आणि दर्जेदार खड्डे दुरुस्तीचे काम प्रभावीपणे केले असून, नाशिक महानगरपालिकेनेही त्याचा अवलंब करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांची विकासकामे ज्या ठेकेदारामार्फत केली जात आहेत, त्याच ठेकेदाराकडे संबंधित रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारीही सोपविण्यात यावी, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली. यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेची जबाबदारी निश्चित होईल, कामांमध्ये सुसूत्रता येईल आणि नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व खड्डेमुक्त रस्त्यांचा लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
महापौर हिमगौरी अडके-आहेर, आयुक्त मनीषा खत्री तसेच महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी यावेळी पाहणीत सहभाग घेतला. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरून नाशिक खड्डेमुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने यावेळी दिली.

Make Nashik city pothole-free on a war footing.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *