देशभरात विविध राज्यांमध्ये पावसाचे थैमान

नवी दिल्ली :
देशभरात विविध राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे.
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर आला असून, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण बेपत्ता आहेत.
रविवारी झालेल्या
ढगफुटीमुळे जम्मू आणि
काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील छतरू भागात अचानक पूर आला. अनेक घरे आणि दुकानांचे नुकसान झाले, दोन गाड्या वाहून गेल्या आणि रस्त्यांवर ढिगार्‍यांचा खच पडला. खबरदारीचा उपाय म्हणून किश्तवार, डोडा आणि रामबन येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तरकाशीमधील
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरही भूस्खलन झाले. चमोलीतील गौचरजवळ कामेडा येथे बद्रिनाथ महामार्गाचा 20 मीटरचा भाग खचल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. हवामान विभागाने 7 ऑगस्टपर्यंत खराब हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड आणि अप्पर कुट्टनाड भागात पुराचा धोका वाढला आहे. पंबा आणि अचन्कोविल नद्यांची पातळी सतत वाढत असून, अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. वीयपुरम आणि चेरुथाना गावांमध्ये पुरामुळे 100 हून अधिक घरांवर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्रात पाऊस घेणार ‘ब्रेक’
जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावत राज्याला दिलासा दिला. बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून, 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाजदेखील वर्तविण्यात आला आहे. नैर्ऋत्य मान्सूनच्या दुसर्‍या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. 15 ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.

आठ मृत्यू, आठ बेपत्ता

केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 8 जण बेपत्ता आहेत. या आपत्तीत 13 जण जखमी झाले आहेत. राज्यभरातून 5,792 लोकांना सुरक्षित स्थळी हलवून 209 मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे.

Heavy rains in various states across the country

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *