– राजेश शिरभाते
दिल्लीतील जंतर-मंतरवर देशातील तरुणाईने केलेले आंदोलन यशस्वी झाले. ज्या आंदोलनाकडे सरकारने आधी दुर्लक्ष केले आणि नंतर अत्यंत क्रूरपणे ते चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याच आंदोलनातील प्रमुख मागणी सरकारला मान्य करावी लागली. बरं हे आंदोलनही कोणा विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने नव्हे, तर एका नुकत्याच राजकारणात आलेल्या मुलाने यशस्वी करून दाखवले. हे आंदोलन सरकारने फार मोठा पराभव म्हणून मनावर घेतल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाचे सोकॉल्ड विश्लेषण आणि चिरफाड सुरू आहे. मग ती संपूर्ण आंदोलनाबाबत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्यांबद्दल आहे किंवा मग आंदोलनामधील भाषेबाबत आहे. या आंदोलनाच्या मुख्य कारणांकडे आणि त्याच्या परिणामांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करून त्या आंदोलनाला पुन्हा एकदा बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी समाजमाध्यमावर सुरू केलेला आहे. लोकशाहीत अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विरोधकांना कायम बदनाम करू शकत नाही. या सत्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना ती घटना का घडली, त्याची कारणमीमांसा आधी समजून घेतली पाहिजे. नीट परीक्षा हा अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा एक पाया असतो. त्यातही अनेक गरीब आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची ती एक संधी असते. आपल्या देशाची गरज पाहून स्वातंत्र्यानंतरच्या नजीकच्या काळात म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात देशांतर्गत शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आले. काळानुरूप त्यातील प्रवेशासंदर्भात प्रगती होऊन देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पद्धती राबविण्यात आली. सरकारकडून ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे त्यांच्या यंत्रणेकडून, देशातील वैद्यकीय शिक्षणाची प्रगती, देशाला आवश्यक असलेल्या डॉक्टरांचा विचार करून ही परीक्षा घेतली जात असते. आजही भारतात आवश्यक असलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे हे आकडेवारी सांगते. त्यात सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा विचार करून, देशाच्या भविष्याचा विचार करून ही परीक्षा राबवली जात असते. त्यामुळे सरकारकडून ती योजनाबद्ध पद्धतीने घेतली जात असते. इतरही अनेक परीक्षा तशाच पद्धतीने घेतल्या जात असतात. या परीक्षांसाठी प्रवेश फीही असते. मुले ती भरतात व भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी जीव तोडून अभ्यास करतात. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या अनेक वेळा फुटतात. त्या फोडण्यात सत्ताधारी पक्षाच्या काही संबंधितांचा हात असतो, असा एक सार्वत्रिक समज सध्या वाढीला लागला आहे. त्यांच्या वरील कारवाईचा जो वेग आहे, तो पाहता विद्यार्थ्यांमध्ये सरकार आपले प्रश्न समजून घेत नाहीत अशी एक सार्वत्रिक भावना वाढीला लागली होती. सरकारने शिक्षणाकडे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे जितक्या गंभीरपणे पाहायला हवे आहे, तितके हे सरकार गंभीरपणे पाहत नाही, असाही समज विद्यार्थ्यांमध्ये होता. नीट पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. जर नीट परीक्षा चांगल्या पद्धतीने झाल्या असत्या तर त्यांना आपला जीव द्यावा लागला नसता, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. या आत्महत्यांकडे सरकारने जितके संवेदनशील पद्धतीने पाहायला हवे होते तितके पाहिले नाही. त्यामुळे सरकार देशातील लोकांच्या जीवाकडे गंभीरपणे पाहत नाही असा विचार विद्यार्थी करू लागले.
या सार्या विचारांनंतर सरकारकडे आपण आता दाद मागितली पाहिजे, हा एक सहज विचार विद्यार्थ्यांच्या मनात आला. त्याला आपल्या समाजमाध्यमांवरून खान सर यांच्यासारख्या अनेकांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यात सरकारची री ओढणार्या एका माध्यमाच्या एका निवेदिकेने या शिक्षकांचाच अपमान केला. त्यांना बदनाम करायला सुरुवात केली. त्याची दाद मागण्यात आली. त्याच दरम्यान एका उच्चपदस्थ सरकारी संस्थांच्या प्रमुखांनी देशातील युवावर्गाला झुरळ संबोधल्याचा गैरसमज मुलांचा झाला. हे सरकार आणि त्यांच्या यंत्रणा आपल्याला घरातील झुरळांची उपमा आणि वागणूक देतात, असा समज विद्यार्थ्यांमध्ये रूढ झाला. याच तरुणांचा आवाज बनून अभिजित दीपके नावाचा तरुण पुढे आला. त्याच्या मागणीवरही खिल्ली उडवण्यात आली. भाजपाच्या काही लोकांनी तर पिशवीतून झुरळ आणून ती मारण्याचे व्हिडिओ काढण्याचे आंदोलन केले आणि विद्यार्थ्यांचा अधिक अपमान झाला. अनेकांनी त्यात एक स्वतःला मोठा विद्वान समजणारा आणि प्रत्यक्षात सत्ताधार्यांच्या दारात बसणार्या कवीच्या काही विधानांनीही आगीत तेल ओतले. अभिजित दीपकेला जाहीर आव्हान देण्यात आले. त्यामुळे तो परदेशातून दिल्लीत आला आणि त्याने जंतर-मंतरवर आपले आंदोलन जाहीर केले. या आंदोलनाला पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनीही सक्रिय पाठिंबा जाहीर केला. वांगचुक यांना सरकारने आधी लडाखमधील एका आंदोलनादरम्यान अटक करून तुरुंगात डांबले होते. त्यांनी दिल्लीत उपोषण सुरू केले. त्याकडे सरकारने एकीकडे दुर्लक्ष आणि दुसरीकडे आपल्या हातातील माध्यमांद्वारे बदनामी असे दुहेरी शस्त्र अवलंबिले. आपल्या या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे हे पाहून त्यांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावेळीही या आंदोलकांशी बोलून त्यातून मार्ग काढण्याऐवजी हे आंदोलन चिरडण्याची योजना सरकारने तयार केली. विद्यार्थ्यांवर अमानुषपणे हल्ला करण्यात आला. काठ्यांना खिळे, आंदोलकांमध्ये गुंड घुसवणे व त्यांच्याकडून मारहाण करण्यात आली. तंत्रज्ञानात हुशार असलेल्या या विद्यार्थ्यांनी या घटनांचे व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केले. एकीकडे सरकारधर्जिणी माध्यमे आंदोलकांना गुंड ठरवत असतानाच, विद्यार्थ्यांमधील समाजमाध्यमांवरच्या वाहिन्यांनी सरकारी क्रूरतेचा खरा चेहरा दाखवला. त्यानंतर देशभरात सरकारच्या विरोधात एकच आवाज निर्माण झाला. जगात आपली चांगली प्रतिमा तयार झालेली असताना व जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरुद आपण मिरवत असतानाच लहान विद्यार्थी आणि खासकरून त्यातील मुलींवर जे अत्याचार करण्यात आले त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा काहीशी मलिन झाली. त्याचाही राग देशभक्त नागरिकांमधून उमटायला लागला. त्यावर सरकारने एक पाऊल मागे येत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला आणि विद्यार्थ्यांची जिरवण्यासाठी दुसरा त्याहीपेक्षा गंभीर नसलेले शिक्षणमंत्री आणले.
आपल्या सरकारला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागल्यानंतरही सरकारने मोठ्या मनाने या विद्यार्थ्यांना वागवायला हवे होते. त्याऐवजी संपूर्ण देशभर या विद्यार्थ्यांची बदनामी आणि त्यांचे भविष्य कशाप्रकारे खराब होईल, या हेतूने सध्या त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हे करण्यापेक्षा सरकारकडे अनेक मार्ग उपलब्ध होते. एक या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच विश्वासात घेऊन त्यांना समजावून त्यांच्या मागण्यांवर विचार करायला हवा होता. किमान तसा आभास तरी करण्यात ते यशस्वी होऊ शकले असते.
हे विद्यार्थी म्हणजे कोणी देशद्रोही आहेत हा जो समज पसरण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांच्या संघटनेने त्यांच्या आयटी सेलमार्फत करण्यात आला, तो करायला नको होता. हे आपल्या देशातील विद्यार्थी आहेत. त्यांची अडचण समजून घेणे ही सत्ताधारी म्हणून आपली जबाबदारी आहे. इतका साधाविचार जरी करण्यात आला असता तरी पुढचा सारा प्रसंग टळला असता. एका पक्षाला किंवा एखाद्या व्यक्तीला विरोध केला म्हणजे देशविरोधी आहे. हा जो एक नवा प्रकार सुरु करण्यात आला आहे. तो देशातील प्रश्न सोडवण्यापेक्षा वाढवत आहे हा विचार आतातरी करायला हवा होता. कोणताही देश एका व्यक्तीने तयार होत नाही. त्यात सार्यांचे कष्ट असतात. सकाळी रस्त्यावर जी व्यक्ती झाडू मारते तीही एका प्रकारे देशउभारणीत आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावत असते. हा देश आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपल्याला एकत्र मिळूनच या देशातील प्रश्न सोडवायचे आहेत एवढा जरी विचार केला तरी या आंदोलनाचे ते खरे विश्लेषण असेल. अन्यथा कोणी एक जर कोणाला बदनाम करत असेल तर तोही त्याची प्रतिक्रीया त्याच्या पद्धतीने नोंदवणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेली शिवराळ भाषा वाईट असेल तर सरकारकडून काठीला खिळे ठोकून विद्यार्थ्यांना मारणेही तितकेच निंदनीय आहे.
Analysis of the agitation