– भावना कुलकर्णी
किताबें, स्क्रीन और
सवाल बहुत हैं ज़िंदगी में,
मगर तजुर्बे का कोई
शॉर्टकट नहीं होता।
जो बातें उम्र सिखाती है
ख़ामोशी से,
वो किसी जवाब में
लिखा नहीं होता।
प्रिय तरुण मित्रांनो,
सर्वप्रथम एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते-तुमची पिढी विलक्षण आहे. तुमच्याकडे जगभरातील माहिती काही क्षणांत पोहोचते. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आहे, प्रश्न विचारण्याचे धाडस आहे, स्वतःचे मत मांडण्याचा आत्मविश्वास आहे. ही तुमची ताकद आहे आणि ती जपलीच पाहिजे. माहिती आणि अनुभव यांची गल्लत करू नका. आज मोबाइलवर काही मिनिटांत एखाद्या विषयावर दहा व्हिडिओ पाहता येतात. ChatGPT, Google किंवा पॉडकास्ट अनेक प्रश्नांची उत्तरे देतात. पण उत्तर मिळणे आणि ते आयुष्यात जगता येणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजा, तुम्ही पनीरची भाजी करण्याचे दहा व्हिडिओ पाहिले. रेसिपी पाठ झाली. मसाले कोणते, प्रमाण किती, वेळ किती-सगळे समजले. पण पहिल्यांदा स्वतः स्वयंपाकघरात उभे राहिल्यावर लक्षात येते की गॅसची आच, मसाल्याचा सुगंध, मीठाचे योग्य प्रमाण आणि चवीचा अंदाज हे व्हिडिओ शिकवत नाहीत; ते हाताला आणि अनुभवाला शिकावे लागते. जीवनही अगदी असेच असते. नाती कशी जपायची, पालकांना कसे समजून घ्यायचे, मित्रांशी मतभेद कसे मिटवायचे, एखाद्या अपयशानंतर पुन्हा कसे उभे राहायचे-याची माहिती मिळू शकते; पण त्या प्रत्येक प्रसंगातून स्वतः चालत गेल्याशिवाय त्याचा खरा अर्थ समजत नाही. म्हणून प्रश्न विचारू नका, असे अजिबात नाही. उलट, भरपूर प्रश्न विचारा. जिज्ञासा हीच प्रगतीची सुरुवात आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा- जेव्हा तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीला प्रश्न विचारता, तेव्हा ते केवळ उत्तर देत नसतात; ते त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा अनुभव तुमच्यासमोर ठेवत असतात. त्या अनुभवामागे यश असते, चुका असतात, अपयश असते, संघर्ष असतो आणि शिकण्याचा प्रदीर्घ प्रवास असतो. कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला माहिती देऊ शकते. पुस्तके तुम्हाला ज्ञान देऊ शकतात. पण संयम, माणुसकी, नाती, विश्वास आणि जबाबदारी-हे अजूनही आयुष्यच शिकवते. म्हणून माहिती मिळाली म्हणून थांबू नका. ती पडताळून पाहा. अनुभवून पाहा. चुका करा. त्या स्वीकारा. पुन्हा उभे रहा. कारण खरे शिक्षण तेव्हाच सुरू होते. तुमच्याकडे वेग आहे. ज्येष्ठांकडे दिशा आहे. हे दोन्ही एकत्र आले, तर केवळ यशस्वी नाही तर समंजस आणि संवेदनशील समाज घडू शकतो. शेवटी एवढेच- मोबाइलमध्ये उत्तरे सापडतील; पण आयुष्याचे अर्थ अजूनही माणसांत, नात्यांत आणि अनुभवांतच सापडतात.
Try living a little beyond just information!