लिफ्ट दिली, कारमध्ये बसवले अन् चाकूच्या धाकाने दागिने लुटले

महिलेला रस्त्यात उतरवून तिघे पसार; 45 हजारांचे दागिने लंपास

सिन्नर : प्रतिनिधी
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 60 वर्षीय महिलेला कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना नांदूर शिंगोटे-निमोण मार्गावर घडली. कारमधील तिघांनी महिलेचे डोके दाबून गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याची फुले बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर महिलेला रस्त्यात उतरवून संशयितांनी कारसह पलायन केले.
लता कैलास आव्हाड (60), रा. गारे मळा, माळवाडी, ता. सिन्नर या निमोणकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या मुलाने पांढर्‍या रंगाच्या वॅगनआर कारला हात दाखवून त्यांना कारमध्ये बसवून दिले.
प्रवासादरम्यान कारमधील एका व्यक्तीने आव्हाड यांचे डोके दाबले आणि चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व कानातील सोन्याची फुले हिसकावून घेण्यात आली.
चोरीस गेलेल्या ऐवजात 10 ग्रॅम वजनाचे सुमारे 30 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र आणि 5 ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील फुले, असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.
घटनेनंतर संशयितांनी महिलेला कारमधून खाली उतरवून वाहनासह पलायन केले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढर्‍या रंगाच्या वॅगनआरमधील तिघे संशयित 35 ते 40 वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Offered a lift, got them into the car, and robbed them of their jewelry at knifepoint.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *