‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हा पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या प्रोफाइल चित्रांवर तिरंगा ठेवून या राष्ट्रीय उत्सवात सामील होण्याची विनंती पंतप्रधानांनी केली आहे. देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या दुहेरी औचित्यावर ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून तो क्षण कॅमेर्‍यात टिपून हर घर तिरंगा डॉट कॉम या अधिकृत वेबसाइटवर सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे आणि राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान वाढवणे हा आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी एक नवीन व्हिडिओ संदेशही जारी केला असून, त्यात ‘हर घर तिरंगा’ हा केवळ एक उपक्रम न राहता प्रत्येक घराघरात साजरा होणारा उत्सव बनावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून, तिरंग्याप्रति आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

Prime Minister appeals to citizens to participate in the ‘Har Ghar Tiranga’ campaign.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *