गोदावरी कालव्यात कार कोसळून महिलेचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
नातेवाइकाच्या दशक्रिया विधीसाठी इगतपुरीहून सोमठाण्याकडे निघालेल्या चौघांवर वाटेतच काळाचा घाला आला. गोदावरी पाटाच्या वळणावर चालकाला अंदाज न आल्याने वॅगनर कार पाटातील पाण्यात कोसळली. मंगळवारी (दि. 11) रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुमनबाई सुकदेव कोरडे (73) यांचा मृत्यू झाला. चालकासह तिघे जखमी झाले.
सुनील निवृत्ती कोरडे हे वॅगनर (एमएच-03-सीएच-0949) मधून सुमनबाई कोरडे, चंद्रभागा निवृत्ती कोरडे (70) आणि सिद्धेश माधव कोरडे (19) यांच्यासह सोमठाणे येथे नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी येत होते.
सोमठाणे गावाजवळील गोदावरी पाटाच्या वळणावर चालकाला रस्त्याचे वळण लक्षात आले नाही. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार पाटातील पाण्यात जाऊन पडली. कारमध्ये पाणी शिरल्याने चौघेही आत अडकले. अपघाताची माहिती मिळताच हवालदार विनोद इप्पर, स्वप्नील पवार, प्रमोद भोये आणि रत्नाकर तांबे घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी कारच्या काचा फोडून चौघांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी सुमनबाई कोरडे यांना तपासून मृत घोषित केले. सुनील कोरडे, चंद्रभागा कोरडे आणि सिद्धेश कोरडे यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेची एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद पाटील पुढील तपास करीत आहेत.

Woman dies after car plunges into Godavari canal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *