मुंबईतील दोन डॉक्टरांना पाकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

जिनांचे सीक्रेट लपवून ठेवल्यामुळे आठ दशकांनंतर मरणोत्तर सन्मान

मुंबई :
पाकिस्तानातर्फे देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ मुंबईतील दोन पारशी डॉक्टरांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. डॉ. जल रतनजी पटेल (फिजिशियन) आणि डॉ. जल धायभो-कू (रेडिओलॉजिस्ट) अशी या दोन भारतीय डॉक्टरांची नावे आहेत. पाकिस्तानचे नियोजन मंत्री आणि पुरस्कार समितीचे प्रमुख अहसान इक्बाल यांनी याबाबत घोषणा केली असून, मार्च 2027 मध्ये होणार्‍या एका विशेष समारंभात हा सन्मान औपचारिकरीत्या प्रदान करण्यात येणार आहे.
या सर्वोच्च सन्मानामागील मुख्य कारण म्हणजे, या दोन्ही डॉक्टरांनी पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांच्या गंभीर आणि प्राणांतिक आजाराचे रहस्य अत्यंत निष्ठेने लपवून ठेवले. 1946 मध्ये या डॉक्टरांनी जिना यांच्या एक्स-रेची तपासणी केली होती, ज्यामध्ये जिना यांना क्षयरोग झाल्याचे आणि त्यांच्याकडे जगण्यासाठी केवळ एक ते दोन वर्षांचे आयुष्य उरले असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, वैद्यकीय व्यावसायिक गुप्ततेच्या शपथेचे काटेकोरपणे पालन करत या डॉक्टरांनी ही माहिती जगापासून अत्यंत गुप्त ठेवली.
वैद्यकीय गोपनीयतेचे पालन
पाकिस्तान सरकारच्या मते, या डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय गोपनीयतेचे पालन करून केलेली कृती पाकिस्तानच्या निर्मितीसाठी अप्रत्यक्षपणे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान ठरली. मंत्री अहसान इक्बाल यांनी या डॉक्टरांच्या निष्ठेला शांत पण असामान्य सेवा असे संबोधले आहे. जवळपास आठ दशकांनंतर, पाकिस्तानच्या इतिहासातील एका अत्यंत निर्णायक वळणावर केवळ आपल्या व्यावसायिक निष्ठेचे इमानेइतबारे पालन केल्याबद्दल, या दोन भारतीय डॉक्टरांना पाकिस्तानाकडून हा सर्वोच्च गौरव दिला जात आहे.

पाकिस्तान निर्मितीचा मार्ग मोकळा
जिना यांच्या आजाराची माहिती गुप्त राहिल्यामुळेच फाळणी आणि पर्यायाने पाकिस्तानच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला, असे मानले जाते. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांच्या ’फ्रीडम ट मिडनाइट’ या पुस्तकातील नोंदीनुसार आणि तत्कालीन ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या दाव्यानुसार, जर त्यांना जिना यांच्या गंभीर आजाराची कल्पना त्यावेळी असती, तर त्यांनी स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा निर्णय काही महिने पुढे ढकलला असता. तसे झाले असते तर कदाचित इतिहास वेगळा असता आणि पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती, असा ऐतिहासिक दावा
केला जातो.

Two Mumbai doctors receive Pakistan’s highest civilian award.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *