मराठा समाजाला न्याय देण्याचे काम महायुतीने केले

उपमुख्यमंत्री शिंदे : परभणीत शेतकरी, युवा संवाद मेळावा

परभणी :
कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी होत आहे. खर्‍या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कुणाचेही आरक्षण कमी न करता 12 ते 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय झाल्याचे ते म्हणाले.
येथील स्टेडियम मैदानावर शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि. 30) दुपारी शेतकरी व युवक संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्याचे वित्त व राज्यमंत्री आशिष जयस्वाल, संयोजक तथा खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, माजी आमदार शंकरराव धोंडगे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, आमदार सईद खान, जालना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, परभणीचे महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भास्कर लंगोटे, संपर्कप्रमुख राजू कापसे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकर्‍यांचा पहिला हक्क व अधिकार आहे, असे नमूद करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत सातत्याने शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेतून राज्य व केंद्रातील डबल इंजिन सरकारने प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले आहेत. मायबाप शेतकर्‍यांच्या आपत्तींतसुद्धा हे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अलीकडे महायुती सरकारने अहिल्याबाई होळकर कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेतूनच परभणी जिल्ह्यात 508 कोटींंची कर्जमाफी झाली आहे, अशी माहिती दिली. राज्य व केंद्रातील सरकार शेतकर्‍यांना कधीही वार्‍यावर सोडणार नाही, शेतकर्‍यांच्या अडीअडचणीत हे सरकार निश्चितपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी
दिली.
महिलांकरिताही या सरकारने बहुतांशी निर्णय घेतले आहेत. त्याद्वारे महिलांचा सन्मान वाढावा, यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. लाडकी बहीणसारखी योजना महिलांना सन्मान देणारी ठरली आहे. या लाडक्या बहिणी लखपती व्हाव्यात, यादृष्टीनेही हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करणार आहे, असे स्पष्ट करतेवेळी शिंदे यांनी महिलांचा आत्मसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यातील युवकांनाही मोठ्या प्रमाणावर कामे मिळावीत, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः युवा शक्तीत मोठी ताकद आहे. युवक कष्टाळू आहेत. या युवकांना संधी मिळाली पाहिजे, ती संधी निश्चितपणे दिली जात आहे. युवकांच्या कौशल्य विकासाकरीता सारे प्रयत्न सुरु आहेत. स्टार्टअप, पॅकेजिंग वगैरेसारख्या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. एआयच्या माध्यमातून भविष्यात युवकांना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. युवकांच्या पाठीशी हे सरकार निश्चितच खंबीरपणे उभे राहील, असे ते म्हणाले. युवकांनी चेंजमेकर बनले पाहिजे, बदल घडविले पाहिजे, नोकरीच्या मागे लागण्याऐवजी नोकरी देणारे बनले पाहिजे, असे आवाहनही केले.

The Mahayuti has worked to deliver justice to the Maratha community.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *