फडणवीस-शिंदेंकडून मराठा समाजाचे नुकसान

मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्रे वितरित करावीत, या प्रमुख मागणीवर जरांगे ठाम आहेत.
या आंदोलनातून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजावर जाणीवपूर्वक आकस ठेवून नुकसान करत आहेत, तर उपमुख्यमंत्री शिंदे त्यांना मूकसंमती देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास हे आंदोलन मुंबईत वळवण्याचा आणि थेट ’वर्षा’ निवासस्थानावर धडक देण्याचा इशारा जरांगे यांनी दिला.

12 तारखेला राज्यव्यापी बैठक

सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन मार्ग न काढल्यास येत्या 12 तारखेला राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील निर्णायक दिशा ठरवण्यात येईल, असा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जरांगे पाटलांना भेटणार : उदय सामंत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू झाले आहे. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची उद्या किंवा परवा मी भेट घेणार आहे. पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ, असे मोठे वक्तव्य मंत्री सामंत यांनी केले आहे. शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कामध्ये असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

Maratha community harmed by Fadnavis and Shinde.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *