इगतपुरीतील नाल्याच्या कामाचा उडाला बोजवारा

चिखलामुळे अपघात वाढले, नागरिक संतप्त

इगतपुरी : प्रतिनिधी
शहरालगतून जाणार्‍या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 च्या सर्व्हिस रोडलगत सुरू असलेल्या नाल्याच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खोदकामाची माती रस्त्यावरच टाकल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वार व पादचारी घसरून पडण्याच्या घटना रोज घडत आहेत.
पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराने खोदलेला गाळ व माती तत्काळ न हटवता रस्त्यावरच टाकून दिल्याने संपूर्ण सर्व्हिस रोड चिखलमय झाला आहे. नाल्यांसाठी मोठे खड्डे खोदून ठेवले असून कोणतेही सुरक्षा कठडे किंवा सूचनाफलक लावलेले नाहीत. यामुळे शनिवार-रविवार सुट्टीत येणारे पर्यटक, महिला, लहान मुले यांना अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. परिसरात असलेल्या शासकीय, शाळा, महिंद्रा कंपनी, हॉटेल्समध्ये जाणारे विद्यार्थी, कामगार यांना रोज याच चिखलातून प्रवास करावा लागतो.
पिंप्रीफाटा, नांदगाव फाटा, तळेगाव फाटा येथे परिस्थिती अधिक गंभीर आहे. पेट्रोलपंपावर जाण्यासाठी आणि रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी अंधारात अनेक जण खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.

सांडपाणी नाल्यात वळवण्याची मागणी

स्थानिक नागरिकांनी वस्तीचे सांडपाणी नाल्यात वळवण्याची मागणी केली असताना, ठेकेदार उलट दिशेने पाणी सोडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाबाबत दोन महिन्यांपूर्वी उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी शशिकांत आडके यांना निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील चिखल तत्काळ हटवावा व काम जलद पूर्ण करावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

 

Drainage work in Igatpuri turns into a fiasco.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *